श्री अम्बिका योगाश्रमाचा २६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
मुंबई प्रतिनिधी: प्रविणभाऊ पवार
भिवंडी तालुक्यातील लाखीवली गावात निसर्गरम्य परिसरात वसलेल्या अम्बिका योगाश्रमाच्या प्रकल्पात “श्री अम्बिका योगाश्रमाचा २६ वा वर्धापन दिन” गुरूवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अत्यंत भक्तीभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

या वर्धापन दिन सोहळ्यासाठी महाराष्ट्रभर पसरलेल्या श्री अम्बिका योगाश्रमच्या विविध शाखांमधून ७०० ते ८०० योगसाधक व योगशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास संस्थेचे प्रमुख कार्यवाह श्री. विनायक देसाई गुरुजी, ज्येष्ठ योगशिक्षक श्री. व सौ. कर्पे, तसेच अम्बिका हेल्थकेअर प्रॉडक्शनचे प्रमुख श्री. पै यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व योगसाधक व योगशिक्षकांनी एकत्र येऊन गायत्री मंत्राचे १०८ वेळा सामूहिक जप करून केली. त्यानंतर वातावरण शुद्ध व ऊर्जामय करणारा ओंकारनाद करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण आश्रम परिसर अध्यात्मिक शांततेने व सकारात्मक उर्जेने भरून गेला.
यानंतर नव्या बॅचमधील काही योगसाधकांनी आपले मनोगत व्यक्त केले. योगसाधनेपूर्वी व योगसाधनेनंतर त्यांच्या शारीरिक व मानसिक तसेच व्यवहारिक जीवनात झालेले सकारात्मक बदल, योगाश्रमाकडून मोफत योगशिक्षण देण्याच्या सेवाभावी वृत्तीने प्रेरणा मिळाल्याचे अनुभव, तसेच महाराष्ट्रातील विविध शाखांमधील योगसाधक व योगशिक्षकांमधील आपुलकीचे व सौहार्दपूर्ण संबंध याबद्दल त्यांनी मनापासून भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या स्वानुभवांनी उपस्थितांना प्रेरणा व सकारात्मक ऊर्जा मिळाली.*
या सोहळ्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘योगशिक्षक पदवीदान – २०२५’ प्रदान समारंभ. अम्बिका योगाश्रममध्ये सलग २ वर्षांचे योगशिक्षण पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नव्या योगशिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते योगशिक्षक पदवी प्रदान करण्यात आली. श्री विनायक देसाई गुरूजींनी उपस्थितांना संस्थेच्या एकूण कार्याबद्दलची माहिती व योग शिक्षणाविषयीचे अमूल्य असे मार्गदर्शन केले. कार्यक्रम स्थळी आनंद व अभिमानाचे वातावरण होते.
कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने करण्यात आली. त्यानंतर आयोजित केलेल्या स्नेहभोजनात योगसाधक व योगशिक्षकांनी एकमेकांशी मुक्त संवाद साधला, प्रश्नोत्तरे झाली व अनुभवांची देवाणघेवाण झाली. याच वेळी अम्बिका योगाश्रमच्या आयुर्वेदिक, रसायनमुक्त हेल्थकेअर उत्पादनांचे नाममात्र दरात प्रदर्शन व विक्रीही करण्यात आली, ज्यास उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला.
यासोबतच, संस्थेचे प्रमुख कार्यवाह श्री. विनायक देसाई गुरुजी लिखित ‘अनुपाठ’ हे योगशास्त्राचा सार सांगणारे व शास्त्रोक्त योग आपल्या दैनंदिन जीवनात सहजपणे कसा अवलंबावा याचे मार्गदर्शन करणारे पुस्तक उपस्थितांसाठी विक्रीस उपलब्ध करण्यात आले होते त्याला खुप प्रतिसाद मिळाला.













