भारत–फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

भारत–फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी जागतिक स्थैर्य, समृद्धी आणि नियमाधिष्ठित व्यवस्थेला बळकटी देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत–फ्रान्स संबंधांना **‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’**चा नवा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा केली. फ्रान्स प्रजासत्ताकचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई भेटीदरम्यान लोकभवन येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती देण्यात आली. यावेळी दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांसह परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते.

या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या हस्ते भारतामध्ये एअरबस एच१२५ हेलिकॉप्टरसाठी टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्सच्या असेंब्ली लाईनचे दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. हा प्रकल्प भारत–फ्रान्स परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे. यामुळे भारतात तयार होणारी ही हेलिकॉप्टर्स जागतिक बाजारपेठेत निर्यात केली जाणार आहेत. फ्रान्सच्या सहकार्याने माउंट एव्हरेस्टच्या उंचीपर्यंत उड्डाण करू शकणारे एकमेव हेलिकॉप्टर भारतात तयार होणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि फ्रान्सचे संबंध परस्पर विश्वासावर आधारित आहेत. फ्रान्स हा भारताचा सर्वात जुना धोरणात्मक भागीदार आहे. अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखाली या भागीदारीला नवी ऊर्जा मिळाली आहे. सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत ही भागीदारी केवळ द्विपक्षीय मर्यादेत न राहता जागतिक स्थैर्य आणि प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. खोल समुद्रापासून उंच पर्वतांपर्यंत संयुक्त क्षमतेचा विस्तार होणार असून, हे सहकार्य तंत्रज्ञान, संरक्षण, ऊर्जा आणि अवकाश क्षेत्रात नवे क्षितिज खुले करेल.

पंतप्रधान मोदी यांनी २०२६ हे वर्ष भारत–युरोप संबंधांसाठी निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट केले. अलीकडेच युरोपियन युनियनसोबत झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे भारत–फ्रान्स व्यापार संबंधांना मोठी चालना मिळणार आहे. ‘इंडिया फ्रान्स इयर्स ऑफ इनोव्हेशन’ उपक्रमांतर्गत संरक्षण, स्वच्छ ऊर्जा, अवकाश आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात उद्योग, स्टार्टअप्स, एमएसएमई, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी संयुक्त इनोव्हेशन सेंटर्स स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच ‘इंडो–फ्रेंच सेंटर फॉर एआय इन हेल्थ’, ‘इंडो–फ्रेंच सेंटर फॉर डिजिटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ आणि एरोनॉटिक्स कौशल्य विकासासाठी राष्ट्रीय केंद्राची स्थापना केली जाणार आहे.

दोन्ही देश लोकशाही मूल्ये, कायद्याचे राज्य आणि बहुपक्षीय व्यवस्थेवर ठाम विश्वास ठेवतात. जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करूनच जागतिक आव्हानांवर प्रभावीपणे मात करता येईल, अशी भूमिका पंतप्रधानांनी मांडली. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इंडो–पॅसिफिक परिसरात शांततेसाठी सर्व प्रयत्नांना समर्थन दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दहशतवादाविरोधात संयुक्त लढ्याची बांधिलकी व्यक्त करत फ्रान्समध्ये लवकरच ‘स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

अध्यक्ष मॅक्रॉन यांनी भारत–फ्रान्स भागीदारी ही परस्पर विश्वास, खुलेपणा आणि महत्त्वाकांक्षा यांवर आधारित असल्याचे सांगितले. मुक्त व्यापाराला पाठिंबा देत भारत–युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराला फ्रान्सचा ठाम पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञान, संरक्षण, व्यापार, आरोग्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त करत दोन्ही देश मिळून जागतिक स्थैर्य आणि समृद्धीसाठी कार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या ऐतिहासिक घोषणेमुळे भारत–फ्रान्स संबंधांना नवी दिशा, व्यापक व्याप्ती आणि दीर्घकालीन धोरणात्मक बळ मिळाले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें