गुहागरची सुकन्या समृद्धी सुरेश आंबेकर चमकली शिक्षण क्षेत्राच्या क्षितिजावर
१०वी बोर्डाच्या परीक्षेत मिळवले ९९.२०%गुण
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील वाघांबे गावची सुकन्या आणि न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे या स्कूलची विद्यार्थिनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने प्रचंड जिद्दीने,मेहनतीने आणि कष्टाने इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९९.२०% गुण मिळवत गुहागर तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला असून रत्नागिरी जिल्ह्यात तिच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे. अतिशय मेहनतीने समृद्धीने आई वडील आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन करीत गुहागरच्या शिक्षण क्षेत्राच्या क्षितिजावर एक आगळा वेगळा ठसा उमटवला आहे. वडील सुरेश आंबेकर हे शिक्षक असून त्यांना सामाजिक कार्याबरोबरच पत्रकारितेची आवड आहे. त्यांचा शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात आणि पत्रकारितेत नावलौकिक आहे. समृद्धीला लहानपणापासूनच आई-वडिलांनी अनेक स्पर्धा परीक्षेत उतरवण्यात मार्गदर्शन केले आणि त्याप्रमाणे समृद्धीने लहानपणापासूनच अनेक पारितोषिके मिळवली आहेत. विज्ञान प्रदर्शनातही तिने आपल्या ज्ञानाचा जोरावर यश संपादन केलेले आहे. समृद्धीला विविध सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पुढील शिक्षणासाठी आणि वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. अतिशय प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाची चीज झाल्याची प्रतिक्रिया समृद्धी सुरेश आंबेकर हिने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. आजोबा, आजी, आई-वडील आणि शिक्षकांचे मार्गदर्शन आणि माझी मेहनत यामुळे मीहे यश संपादन केले आहे असेही समृद्धी सुरेश आंबेकर हिने आवर्जून सांगितले.
न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे या स्कूलचा इयत्ता १० वी परीक्षेच्या बोर्डाच्या निकालामध्ये टॉपरमध्ये कु. समृद्धी सुरेश आंबेकर तिने ९९.२०% गुण मिळवत गुहागर तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला असून मृण्मयी दत्ताराम जाधव हिने ९६.२०% गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला असून श्रद्धा अनिल धुमक हिने ९४.२०% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सामाजिक ,धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

















