कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव
तीन दशकांहून अधिक काळ भजन परंपरा जपणाऱ्या कलाकाराच्या कार्याची दखल; मानाचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन सन्मान
गुहागर, (सुजित सुर्वे,प्रतिनिधी) : गुहागर तालुक्यातील कोंडकारूळ येथील ज्येष्ठ भजनी कलावंत विश्वास मोहन पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानच्या वतीने मानाचा फेटा, पुष्पगुच्छ आणि सत्कारचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. भजन परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात आला.
या सत्कार समारंभास माजी नगरसेवक संजय मालप, महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे संचालक मनोज पाटील, ॲड. प्रसाद जांगळी, कार्यक्रम समन्वयक नितीन घरट, सौ. अनघा घरट, कोंडकारूळ येथील ग्रामस्थ सुधीर नागवेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विश्वास पावसकर यांनी गंगामाता बालमित्र भजन मंडळाच्या माध्यमातून गेली ३० ते ३५ वर्षे अखंडपणे भजन सेवेची परंपरा जपली आहे. ते कोकण भूषण सम्राट बुवा चंद्रकांत कदम यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात.
भजन कलेच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांनी कारूळ, अंजनवेल, आरे, वेळनेश्वर, हेदवी, करदे, अडूर, बोऱ्या आदी परिसरांमध्ये अनेक वर्षे भजन सेवा सादर केली आहे. त्यांच्या या सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेत महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानने गुहागर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचा सन्मान केला.
विश्वास पावसकर यांच्या या गौरवाबद्दल महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानच्या सल्लागार मंडळ व संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
टॅग्स : विश्वास पावसकर सत्कार, कोंडकारूळ बातम्या, गुहागर तालुका, भजन परंपरा, महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान, कोकण सांस्कृतिक वारसा, भजनी कलावंत सन्मान, गुहागर न्यूज.












