साटवली कचरा कुंडी वाटप प्रकरणाची पंचायत समितीकडून चौकशी; २९ जुलैला ग्रामपंचायतीत प्रत्यक्ष शहानिशा
निकृष्ट दर्जा व साहित्याच्या अपूर्णतेच्या तक्रारीची प्रशासनाने घेतली गंभीर दखल; तक्रारदार, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत प्रशासनाला पुराव्यांसह उपस्थित राहण्याचे आदेश
लांजा | प्रतिनिधी : जितेंद्र चव्हाण
साटवली ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या कचरा कुंडी (भांडी) वाटपातील निकृष्ट दर्जा आणि साहित्याच्या अपूर्णतेबाबत करण्यात आलेल्या तक्रारीची पंचायत समिती लांजा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाने प्रत्यक्ष चौकशीचे आदेश दिले असून, दि. २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता साटवली ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी होणार आहे.
प्रसाद लक्ष्मण तरळ आणि ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समिती लांजाचे विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी साटवली ग्रामपंचायतीचे प्रशासक/ग्रामपंचायत अधिकारी तसेच तक्रारदार प्रसाद लक्ष्मण तरळ यांना अधिकृत नोटीस बजावली आहे.
या नोटीसमध्ये “साटवली ग्रामपंचायतमार्फत करण्यात आलेल्या भांडी/कचरा कुंडी वाटपातील साहित्याच्या अपूर्णतेबाबत व दर्जाच्या शहानिशा” करण्यासाठी प्रत्यक्ष चौकशी घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
चौकशीदरम्यान तक्रारदार, संबंधित ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत प्रशासनाने आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रे, छायाचित्रे तसेच अन्य पुरावे घेऊन वेळेत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, ग्रामपंचायतीने वाटप केलेल्या प्लास्टिक कचरा कुंड्यांच्या हँडलची गुणवत्ता तसेच साहित्याच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एकाच खरेदी प्रक्रियेत काही लाभार्थ्यांना चांगल्या तर काहींना निकृष्ट दर्जाच्या कचरा कुंड्या कशा देण्यात आल्या, असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांच्या सह्यांसह निवेदन गटविकास अधिकाऱ्यांकडे (BDO) सादर करण्यात आले होते.
आता पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष स्थळी चौकशी होणार असल्याने या प्रकरणात नेमके काय निष्पन्न होते, दोषींवर काय कारवाई होते आणि सर्व लाभार्थ्यांना दर्जेदार साहित्य मिळते का, याकडे साटवली परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.










