सोमैया विद्याविहार विद्यापीठात ‘समकालीन साहित्य : नवे संदर्भ’ राष्ट्रीय बहुभाषिक संगोष्ठी उत्साहात संपन्न
देशभरातील साहित्यिक, अनुवादक, समीक्षक व संशोधकांचा सहभाग; समकालीन साहित्य, अनुवाद आणि प्रकाशन संस्कृतीवर सखोल मंथन
मुंबई | प्रतिनिधी (मंगेश जाधव):
सोमैया विद्याविहार विद्यापीठाच्या के. जे. सोमैया स्कूल ऑफ लँग्वेजेस अँड लिटरेचरच्या वतीने २४ व २५ जुलै २०२६ रोजी आयोजित ‘समकालीन साहित्य : नवे संदर्भ’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय बहुभाषिक संगोष्ठी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. देशभरातील नामवंत साहित्यिक, अनुवादक, समीक्षक, कवी आणि संशोधक यांच्या उपस्थितीमुळे या संगोष्ठीला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले.
उद्घाटन सत्राला प्रख्यात लेखिका डॉ. सूर्यबाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी साहित्यनिर्मिती, समीक्षा आणि अनुवाद याविषयी मार्गदर्शन करताना नवोदित लेखकांनी चिकित्सक टीका स्वीकारण्याची मानसिकता विकसित करण्याची गरज अधोरेखित केली. केवळ कौतुकाची अपेक्षा न ठेवता टीकेतून स्वतःला अधिक सक्षम करण्याची वृत्ती लेखकांनी जोपासावी, असे त्यांनी सांगितले.
अनुवाद हा दोन भाषा, समाज आणि संस्कृती यांना जोडणारा प्रभावी दुवा असल्याचे सांगत त्यांनी साहित्यनिर्मितीत वास्तव, विवेक आणि संवेदनशीलतेचा समतोल आवश्यक असल्याचे नमूद केले. आजच्या जागतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर साहित्यिकांनी आपल्या लेखनातून मानवता, शांतता आणि सामाजिक बांधिलकीचे विचार मांडण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
सोमैया विद्याविहार विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अजय कपूर यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. विविध सत्रांमध्ये समकालीन कथा, कादंबरी, कविता, अनुवाद आणि प्रकाशन संस्कृती या विषयांवर सखोल चर्चा झाली.
या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिका, समीक्षक व प्रकाशिका डॉ. कुसुमलता सिंह यांच्या हस्ते डॉ. बाळासाहेब लबडे लिखित ‘चिंबोरी युद्ध’ या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. हिंदी साहित्यात व्यंगात्मक कादंबऱ्यांची परंपरा समृद्ध करणारी ही वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
संगोष्ठीत विविध अनुवादित साहित्यकृतींवर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यामध्ये डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या ‘चिंबोरे युद्ध’ आणि ‘मुंबई… बंबई… बॉम्बे’, देवा झिंगाड यांच्या ‘एक रोटी तीन चूल्हे’, डॉ. हेमेंद्र चंडालिया यांनी अनुवादित ‘व्हिलचेयरवर लोकशाही’ तसेच ‘माधव कौशिक यांच्या निवडक कविता’ या पुस्तकांवर चिकित्सक चर्चा करण्यात आली.
‘मुंबई… बंबई… बॉम्बे’ या हिंदी अनुवादाचे अनुवादक भारत वेडे यांनी अनुवाद प्रक्रियेतील अनुभव मांडले. तसेच प्रा. प्रतिभा सराफ यांच्या कथासंग्रहाच्या हिंदी अनुवादाचे, ज्येष्ठ लेखिका डॉ. सूर्यबाला यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. अनुवादक डॉ. गोरख थोरात यांनी कथांतील नावीन्य आणि भाषांतरातील वैशिष्ट्ये स्पष्ट केली.
लेखक डॉ. बाळासाहेब लबडे यांनी समकालीन साहित्य, सामाजिक वास्तव आणि अनुवादाच्या माध्यमातून साहित्य अधिक व्यापक वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेवर विचार व्यक्त केले.
‘अनुवाद आणि प्रकाशन संस्कृती’ या विशेष सत्रात प्रख्यात अनुवादक डॉ. गोरख थोरात यांनी समकालीन साहित्याच्या अनुवादातील आव्हाने, संधी आणि बदलत्या प्रकाशन संस्कृतीवर मार्गदर्शन केले. या सत्रात मनोज पाठक (वर्णमुद्रा प्रकाशन) यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमात डॉ. कुसुमलता सिंह, डॉ. बळीराम गायकवाड, नरेंद्र पुंडलिक, अरुण सिंह, प्रा. प्रतिभा सराफ, डॉ. हेमेंद्र चंडालिया, भारत वेडे, देवा झिंगाड, राजेश विक्रांत यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदविला.
२५ जुलै रोजी विविध संशोधनपर निबंधांचे सादरीकरण, साहित्यिक संवाद आणि मुक्त चर्चांमुळे संगोष्ठी अधिक अभ्यासपूर्ण ठरली. समारोप सत्राला ज्येष्ठ कवी नरेंद्र पुंडलिक प्रमुख उपस्थित होते. त्यांनी अनुवाद, साहित्य आणि समाज यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करत अशा उपक्रमांची आवश्यकता स्पष्ट केली. तसेच डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या ‘मुंबई… बंबई… बॉम्बे’ या हिंदी कवितासंग्रहाचे कौतुक करत, तो शहराच्या ऐतिहासिक आणि सामाजिक जाणिवा प्रभावीपणे मांडणारा महत्त्वपूर्ण संग्रह असल्याचे मत व्यक्त केले.
समारोपप्रसंगी आयोजकांनी सर्व साहित्यिक, संशोधक, अनुवादक, विद्यार्थी आणि उपस्थितांचे आभार मानले. समकालीन भारतीय साहित्य, अनुवाद आणि बहुभाषिक संवादाला नवी दिशा देणारा हा उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.










