आमची भगिनी आर्थिक सक्षम होऊन स्वाभिमानाने जगली पाहिजे: निलेश सांबरे
आबलोलीत जिजाऊ संस्थेतर्फे मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन; महिला सक्षमीकरणाचा निर्धार
आबलोली (बातमीदार – संदेश कदम): 
“गेल्या १०-१२ वर्षांपासून केवळ टीव्ही बघून आणि मोबाईलच्या मागे लागून वेळ घालवण्यापेक्षा आमची भगिनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वाभिमानाने जगली पाहिजे,” असे प्रतिपादन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांनी केले. गुहागर तालुक्यातील आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्रात जिजाऊ संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमादरम्यान निलेश सांबरे यांचे आबलोली ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनात महिलांच्या परिस्थितीवर भाष्य करताना सांबरे म्हणाले की, “सकाळी सर्वात आधी उठणारी आणि रात्री सर्वात उशिरा झोपणारी महिला सर्वांची काळजी घेते. मात्र, स्वतःच्या लहान-मोठ्या गरजांसाठी किंवा आजारपणासाठी तिला पती किंवा मुलांकडे हात पसरावे लागतात, ज्यामुळे तिचा स्वाभिमान दुखावला जातो. महागाई आणि शिक्षणाचा वाढता खर्च लक्षात घेता, महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे.”
रत्नागिरीत महिलांमार्फत शाळा चालवण्याचा मानस
देशात आज महिला रेल्वे, विमानापासून ते प्रशासकीय सेवेत उच्च पदांवर कार्यरत आहेत. बदलापूर येथे महिला बचत गट १९५८ पासून यशस्वीपणे शाळा चालवत असल्याचे उदाहरण देत सांबरे यांनी सांगितले की, “रत्नागिरीतील भगिनींनीही मुलांवर किंवा पतीवर अवलंबून न राहता त्यांना आर्थिक मदत करावी. भविष्यात रत्नागिरीत महिला बचत गटांमार्फत चालवली जाणारी शाळा सुरू करण्याचा आमचा मानस असून, त्यासाठी लागणारा सर्व निधी संस्था उपलब्ध करून देईल.”
या प्रसंगी मोफत जागेची उपलब्धता करून देणारे गारवा कृषी पर्यटन केंद्राचे मालक आणि प्रगतशील शेतकरी सचिन कारेकर यांचा निलेश सांबरे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला जिजाऊ संस्थेचे राज्य सचिव केदार चव्हाण, उद्योजक वसंतदादा उदेग, पोलीस पाटील महेश भाटकर, सरपंच सौ. वैष्णवी नेटके, जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. प्रसाद जांगळे, ओमकार तीवरेकर, अनंत डिंगणकर, सीआरपी महिला आणि ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन बाबुराव सूर्यवंशी व अमरजी राऊत यां
नी केले.










