साटवली विकास सोसायटीच्या एका रिक्त संचालक पदासाठी ५ ऑक्टोबरला निवडणूक; लांजात विशेष सभेचे आयोजन
‘सर्वसाधारण कर्जदार’ प्रवर्गासाठी होणार प्रक्रिया; सहकार अधिकारी संतोषकुमार पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार निवडणूक कार्यक्रम
लांजा प्रतिनिधी (जितेंद्र चव्हाण):
साटवली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, साटवली (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील संचालक मंडळातील ‘सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी’ या प्रवर्गातील एका नैमित्तिक रिक्त जागेच्या निवडीसाठी सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही विशेष सभा दुपारी १२.०० वाजता संस्थेच्या कार्यालयात पार पडणार आहे.
सदर निवडणूक प्रक्रिया आणि सभेचे अध्यक्षस्थान अध्यासी अधिकारी तथा सहकार अधिकारी श्रेणी-१ (सहकारी संस्था, लांजा) श्री. संतोषकुमार पाटील हे भूषवणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे:
* नामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकृती: दुपारी १२.०० ते १२.३०
* नामनिर्देशन पत्र छाननी: दुपारी १२.३० ते १.००
* वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्धी: दुपारी १.०५
* नामनिर्देशन पत्र माघार घेणे: दुपारी १.१० ते १.२०
* अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करणे: दुपारी १.२५
* मतदान प्रक्रिया (आवश्यक असल्यास): दुपारी १.३० पासून पुढे
* मतमोजणी व निकाल: मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच
या रिक्त पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या सर्व पात्र सभासदांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहावे, तसेच सर्व संचालकांनी सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या सचिवांच्या वतीने करण्यात आले आहे.










