- *ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांच्या कवितांचा अंतःस्वर उलगडणारे ‘शब्दांच्या पलीकडचे’ पुस्तक प्रकाशित
*मंत्री आशिष शेलार, खासदार नरेश म्हस्के यांच्यासह राजकीय, नाट्य, चित्रपट आणि साहित्यविश्वातील मान्यवरांची उपस्थिती
ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधून ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे आयोजित कार्यक्रमात मिलिंद मिरजकर लिखित ‘शब्दांच्या पलीकडचे’ या पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन झाले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, खासदार नरेश म्हस्के, ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर, ज्येष्ठ अभिनेते नारायण जाधव आणि सागर तळाशीलकर यांच्यासह राजकीय, नाट्य, चित्रपट आणि साहित्य क्षेत्रांतील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीने प्रकाशन सोहळ्याला विशेष प्रतिष्ठा लाभली.
‘शब्दांच्या पलीकडचे’ हे प्रा. अशोक बागवे यांच्या वीस कवितांचे रसग्रहण करणारे पुस्तक आहे. कवितेचे केवळ शब्दार्थ सांगण्यापलीकडे जाऊन तिच्यातील भावस्पंदने, प्रतिमा, प्रतीके, विचारसौंदर्य आणि अभिव्यक्तीचे विविध स्तर उलगडण्याचा प्रयत्न लेखक मिलिंद मिरजकर यांनी केला आहे. कवितेतील सूक्ष्म संवेदना, अर्थच्छटा आणि अंतःस्वराचा शोध घेताना त्यांनी संवेदनशील वाचकदृष्टीचा परिचय करून दिला आहे. कवीच्या प्रतिभेचा आदर राखत वाचकाला कवितेचा सखोल अनुभव देणे, हे या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे काव्यरसिकांसह कविता समजून घेऊ इच्छिणाऱ्या अभ्यासकांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
प्रा. अशोक बागवे यांच्या कवितेतील शब्दसौंदर्य आणि भावगर्भता यांचा वेध घेताना मिरजकर यांनी कवीच्या सर्जनशीलतेशी चिंतनशील संवाद साधला आहे. कवितेतील भावबंध उलगडत तिच्या आशयाकडे पाहण्याची संवेदनशील दृष्टी या रसग्रहणातून व्यक्त होते. ज्येष्ठ कवीच्या कवितांना संवेदनशील वाचकाने दिलेला हा प्रतिसाद म्हणजे एक अर्थपूर्ण शब्दांजली आहे.
‘शब्दांच्या पलीकडचे’ या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा कल्पक वापर. पुस्तकातील क्यूआर कोडच्या माध्यमातून वाचकांना लेखक मिलिंद मिरजकर यांचे मनोगत त्यांच्या आवाजात व ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांचे मनोगत मंगेश सातपुते यांच्या आवाजात ऐकता येणार आहे. मुद्रित पुस्तक आणि ध्वनिमाध्यम यांची सांगड घालणारा हा प्रयोग वाचनानुभवाला नवा आयाम देतो. परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम साधणाऱ्या या उपक्रमामुळे वाचकांना पुस्तकातील आशयाशी जोडले जाण्याचा आणखी एक मार्ग उपलब्ध झाला आहे.
प्रा. अशोक बागवे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात साहित्य, कविता, ललित गद्य, अभिवाचन, नाट्यप्रवेश आणि सांगीतिक कार्यक्रम अशा विविध कलाविष्कारांची मेजवानी रसिकांना अनुभवता आली. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित झाले. या कार्यक्रमाला मत्स्यमुनी प्रकाशनाच्या मितिला मिरजकर आणि मितू मिरजकर यांचीही उपस्थिती होती.
‘शब्दांच्या पलीकडचे’ हे पुस्तक मत्स्यमुनी प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. पुस्तकाची किंमत १९९ रुपये असून टपालखर्च अतिरिक्त आहे. पुस्तकाची पृष्ठसंख्या १९६ आहे. पुस्तकाच्या प्रती मिळवण्यासाठी ९८१९९१९१७४ या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधता येईल.











