कर्जत–भीमाशंकर वृक्षतोडीविरोधात पनवेलमध्ये फलक आंदोलन!
प्रतिनिधी (मंगेश जाधव)
भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ निसर्गप्रेमी संस्था व पनवेल ट्रेकर्स यांच्या वतीने शिवाजी महाराज चौक, पनवेल येथे फलक आंदोलन करण्यात आले.
“आपल्या छत्रपतींचा सह्याद्री पोखरला जातोय… कर्जत–भीमाशंकर वाचवा!” तसेच “झाडं तोडून विकास झाला की नाही माहीत नाही, दुष्काळ मात्र नक्की पडला!” अशा प्रभावी संदेशांतून पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यात आला. नागरिकांनीही आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
“आमचा विकासाला विरोध नाही; मात्र निसर्गाचा विनाश करून होणारा विकास मान्य नाही. सह्याद्रीचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात निसर्गप्रेमी संस्थेतर्फे श्री. सुनील कर्पे, सौ. सुषमा कर्पे, अविनाश सर, राहुल सर , नागेश हिरवे इत्यादी असंख्य पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सहभागी झाले.










