राजापूर–चुनाकोळवण–दसूरकोंड–साटवली बसफेरी अखेर पूर्ववत सुरू; विद्यार्थी व पालकांमधून आनंद व्यक्त
लांजा प्रतिनिधी- जितेंद्र चव्हाण
राजापूर डेपोमधून सुटणारी राजापूर – चुना कोळवण – दसूरकोंड – साटवली ही एसटी बसफेरी कालपासून पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. ही बस सेवा सुरू झाल्यामुळे या मार्गावरील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची होणारी पायपीट थांबली असून विद्यार्थ्यांमधून अत्यंत समाधान व्यक्त केले जात आहे.
सततच्या पाठपुराव्याला अखेर यश
ही बसफेरी गेल्या काही काळापासून बंद असल्याने विद्यार्थ्यांना दररोज ७ ते ८ किलोमीटर पायी प्रवास करावा लागत होता, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत होता. या समस्येची गंभीर दखल घेत श्री. योगेश सखाराम पाजवे (दिव्यांग) यांनी सर्व बाधित पालकांच्या वतीने राजापूर एसटी आगार प्रमुख, रत्नागिरी विभाग नियंत्रक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता व स्मरणपत्र सादर केले होते.
योग्य वेळी योग्य पाठपुरावा करून आणि आंदोलनाचा इशारा देऊन ही एसटी बस सेवा पुन्हा सुरू करून दिल्याबद्दल योगेश पाजवे यांचे संपूर्ण पंचक्रोशीतून मनापासून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
सर्व सहकाऱ्यांमुळेच हा विजय शक्य: योगेश पाजवे
या संदर्भात बोलताना योगेश पाजवे यांनी सांगितले की, “हा विजय एकट्याचा नसून माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थी या सर्वांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आणि सहकार्यामुळेच मिळाला आहे.” सर्वांनी एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा
साटवली येथील रा. सी. बेडे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तसेच परिसरातील शाळांमध्ये शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना या बस सेवेचा थेट फायदा होणार आहे. एसटी सुरू झाल्यामुळे पालकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला असून प्रशासनाचे व पाजवे यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.










