वृक्षतोडीवरून राज ठाकरे यांचा केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल नवीमुंबई (मंगेश जाधव)
टोरेंट पॉवर कंपनीच्या पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बुधवारी (२८ ऑक्टोबर) कर्जतमध्ये वृक्षतोड झालेल्या परिसराची पाहणी केल्यानंतर त्यांनी पोलीस ग्राउंडवर जाहीर सभा घेतली. या वेळी सह्याद्रीच्या कुशीत महाराष्ट्रात २३ प्रकल्प येत असल्याचा दावा करत त्यांनी या प्रकल्पांच्या उद्देशावर प्रश्न उपस्थित केले. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही त्यांनी थेट निशाणा साधला.
“आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मला फक्त एकच सांगायचं आहे. तुमचे हे सगळे मित्र असतील मेहता वगैरे, अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा आवाज येत नाही. ती ज्यादिवशी तुम्हाला बसेल त्या दिवशी कळेल आपण काय-काय पापं केलीत,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी टीका केली.
सह्याद्रीच्या परिसरात येणाऱ्या प्रकल्पांचा उल्लेख करताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील जंगलतोडीशी संबंधित प्रकल्पांची यादी आपण मांडणार आहोत. या २३ प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प केंद्र सरकारचे असल्याचा दावा त्यांनी केला. अदानी हायड्रो, रिव्ह्यू हायड्रो पॉवर, मेघा इंजिनियरिंग, जेएसडब्ल्यू, टाटा, अदानी आणि टोरेंट यांसह विविध खासगी कंपन्यांच्या प्रकल्पांचाही त्यांनी उल्लेख केला. यामध्ये टाटा आणि अदानी तसेच जेएसडब्ल्यू यांच्या नावांचा पुनरुच्चार करत त्यांनी या प्रकल्पांच्या स्वरूपाबाबत प्रश्न उपस्थित केले.
वीजनिर्मितीच्या प्रकल्पांबाबत बोलताना राज ठाकरे यांनी रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील २३६ प्रकल्पांचा उल्लेख केला. “टेंडर वगैरे काही नाही. मी इथे इतके पैसे टाकतो. मला जंगल तोडून द्या, माणसं मारून द्या,” असे म्हणत त्यांनी या प्रकल्पांच्या प्रक्रियेवर टीका केली. महाराष्ट्रात विजेची कमतरता नेमकी कुठे आहे, हे प्रकल्प कोणासाठी आणले जात आहेत आणि त्यांना मंजुरी का दिली जात आहे, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. त्यांच्या मते, महाराष्ट्रात डेटा सेंटर उभारले जात असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आणि वीज लागणार आहे.
वृक्षतोडीनंतर संबंधित परिसरात कॉलनी उभारली जाईल आणि तेथे बाहेरून आलेली माणसे राहतील, असा दावा राज ठाकरे यांनी केला. या प्रकल्पांचा फायदा महाराष्ट्रातील जनतेपेक्षा इतरांच्या भविष्यातील योजनांसाठी होत असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यात कोळशावर चालणारे ४० वीज प्रकल्प येत असल्याचा उल्लेख करत हे प्रकल्प कोणासाठी आणि कशासाठी उभारले जात आहेत, असा सवाल त्यांनी केला.
राज्यातील मतदारसंघांच्या रचनेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. “तुम्ही नीट सगळ्या गोष्टी पाहिल्यात तर ते तुमचे मतदारसंघ फोडत आहेत. तुम्हाला अल्पमतात आणत आहेत. तुम्ही यापुढे कमी होत जाणार आणि बाकीचे वाढत जाणार. बाकीचे वाढण्यासाठी वीज आणि रस्ते हवेत,” असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील नागरिक दैनंदिन व्यवहारांत गुंतलेले असल्यामुळे राज्याच्या व्यापक प्रश्नांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
भविष्यात महाराष्ट्रातील वीज वितरण व्यवस्था खासगी कंपन्यांच्या हातात जाण्याची शक्यता असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. वीज बिल किती भरायचे, बिल भरता न आल्यास घराची वीज कापायची की नाही, यासारखे निर्णयही खासगी कंपन्यांकडे जाऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. या व्यवस्थेत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील शहरे आणि तालुक्यांचा समावेश होईल, असेही ते म्हणाले. खासगी कंपन्यांचे मालक हे सत्ताधाऱ्यांचे मित्र असल्याचा आरोप करत, संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी खासगी व्यक्तींच्या हातात द्यायची का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कर्जतमधील वृक्षतोडीचा मुद्दा केवळ त्या भागापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्राने त्याकडे एकत्रितपणे पाहण्याची गरज असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. कर्जत, पुणे, नागपूर, रत्नागिरी किंवा मुंबई अशा कोणत्याही भागात संकट आले, तरी तेथील लोकांनीच त्याचा विचार करावा, अशी भूमिका न घेता संपूर्ण महाराष्ट्राने एकजुटीने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. अन्यथा संबंधितांना अपेक्षित असलेले उद्दिष्ट साध्य होईल, असा इशाराही त्यांनी दिला.











