साटवली केंद्राचे गुणवत्तेचे पुरस्कर्ते, धडाडीचे केंद्रप्रमुख श्री. संजयजी दळवी यांच्या पाठीशी ग्रामस्थ व पालक वर्ग खंबीरपणे उभा!
लांजा प्रतिनिधी, जितेंद्र चव्हाण
रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत लांजा तालुक्यातील साटवली केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. संजय शिवाजी दळवी हे आपल्या उत्कृष्ट कार्यशैली, शिस्त आणि शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याने संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरले आहेत. त्यांनी यापूर्वी माजळ गावात आणि सध्या साटवली केंद्रात प्रशासकीय व शैक्षणिक सुधारणांचे उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांच्या या कर्तव्यकठोर आणि पारदर्शक कारभारामुळे काही घटकांकडून त्यांच्या बदलीची मागणी केली जात असली, तरी साटवली परिसरातील सुज्ञ नागरिक, पालक आणि ग्रामस्थ पूर्णपणे श्री. दळवी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.
श्री. दळवी यांनी पदभार स्वीकारल्यापासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय पारदर्शकता आली आहे. ते स्वतः वर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची पाहणी करतात आणि त्यांच्यावर वैयक्तिक लक्ष देऊन गुणवत्तेवर भर देतात. मुलांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते.
त्यांच्या या उत्कृष्ट आणि प्रेरणादायी कामकाजामुळे साटवली, महंमदवाडी, तसेच लावगणवाडीसह केंद्र अंतर्गत येणाऱ्या विविध गावांमधील पालक वर्ग आणि गावकऱ्यांकडून त्यांच्या कामाचे जोरदार कौतुक होत आहे.
अभिमानास्पद बाब – ‘नासा’ (NASA) दौऱ्यासाठी निवड:
नुकत्याच मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, पंचायत समिती लांजा अंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमधून निवड झालेल्या २७ गुणवंत विद्यार्थ्यांच्या अमेरिका (NASA, USA) शैक्षणिक सहलीसाठी छात्रसंघाचे अधिकृत पर्यवेक्षक व मार्गदर्शक म्हणून केंद्रप्रमुख श्री. संजय शिवाजी दळवी यांची शासनाकडून निवड करण्यात आली आहे. साटवली व माजळ परिसराला लाभलेल्या अशा उच्च गुणवत्तेच्या अधिकाऱ्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘नासा’ दौऱ्यासाठी निवड झाल्याने संपूर्ण लांजा तालुक्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण पसरले आहे.
गुणवत्तेशी तडजोड न करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या अशा कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याच्या पाठीशी जनता कायम आहे.











