साटवली पोलीस दूरक्षेत्राचे कामकाज तातडीने सुरू करा- जितेंद्र चव्हाण
नवीन इमारत पूर्ण होऊनही कामकाज सुरू नसल्याने नागरिकांची गैरसोय; कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याची जितेंद्र चव्हाण यांची मागणी
लांजा : प्रतिनिधी जितेंद्र चव्हाण
साटवली व परिसरातील सुमारे २१ ते २२ गावांतील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या साटवली पोलीस दूरक्षेत्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन दोन ते तीन महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप या नवीन इमारतीतून प्रत्यक्ष पोलीस कामकाज सुरू झालेले नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते श्री. जितेंद्र सुरेश चव्हाण यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO), लांजा विभाग तसेच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
साटवली पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात मोठ्या संख्येने गावे येतात. या परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी या दूरक्षेत्रावर आहे. नवीन इमारत बांधून पूर्ण झालेली असतानाही तेथून कामकाज सुरू झालेले नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना विविध तक्रारी अथवा पोलीस संबंधित कामांसाठी लांजा पोलीस ठाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी
साटवली दूरक्षेत्राच्या विस्तृत कार्यक्षेत्राचा विचार करता येथे कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे जितेंद्र चव्हाण यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे. स्थानिक पातळीवर पोलीस यंत्रणा उपलब्ध राहिल्यास नागरिकांच्या तक्रारींवर वेळेत कार्यवाही होण्यास तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यास मदत होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
निवेदनाद्वारे साटवली पोलीस दूरक्षेत्राबाबत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. नवीन इमारत अद्याप कामकाजासाठी खुली का करण्यात आलेली नाही, नवीन इमारतीतून प्रत्यक्ष कामकाज नेमके कधी सुरू होणार आणि दूरक्षेत्रासाठी आवश्यक असलेला कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी वर्ग कधीपर्यंत नियुक्त केला जाणार, याबाबत स्पष्टता देण्याची मागणी करण्यात आली आहे.
साटवली पोलीस दूरक्षेत्राचे कामकाज नवीन इमारतीतून तातडीने सुरू करावे तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे आवश्यक संख्येने कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी जितेंद्र चव्हाण यांनी केली आहे.
या निवेदनाची प्रत माहिती व योग्य कार्यवाहीसाठी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनाही पाठवण्यात आली आहे.










