तळवली जि.प. शाळा क्र. १ मध्ये गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांनी गुरूंप्रती व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव
प्रतिनिधी (मंगेश जाधव) | गुहागर :
गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तळवली क्र. १ येथे गुरु पौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरु पौर्णिमेचे महत्त्व सांगत गुरूंच्या ज्ञानदानाच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी शिक्षक संजय कुळे यांनी गुरु पौर्णिमेचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. गुरूंचा आदर, शिस्त, संस्कार आणि ज्ञानाचे महत्त्व याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका दिपिका दबडे उपस्थित होत्या. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना गुरूंचा आदर राखण्याचे आणि शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले. “गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून विद्यार्थी घडले, तर भारत जगासमोर आदर्श निर्माण करेल,” असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थी प्रतिनिधी कु. खुशी गमरे व कुशल गमरे यांनी मुख्याध्यापिका दिपिका दबडे आणि शिक्षक संजय कुळे यांना पुष्पगुच्छ अर्पण करून गुरु आशीर्वाद घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक संजय कुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.










