जिल्हा परिषद शाळा असगोली नं. २ ची गणपती मूर्ती कारखान्यास क्षेत्रभेट; विद्यार्थ्यांनी अनुभवला ग्रामीण कलाकारांच्या कलाविष्काराचा अनोखा प्रवास
प्रात्यक्षिकातून मिळाले कौशल्याधिष्ठित शिक्षण; गणेश मूर्ती निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांनी जाणून घेतली
गुहागर (सुजित सुर्वे): तालुक्यातील जिल्हा प
रिषद प्राथमिक शाळा असगोली नं. २ येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कलावंतांच्या व्यवसायाभिमुख कलाविष्काराचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी चित्रकार व गणेश मूर्तिकार प्रणय घुमे यांच्या गणपती मूर्ती कारखान्यास क्षेत्रभेट दिली. मुख्याध्यापिका प्रियंका शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शैक्षणिक क्षेत्रभेटीत केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ सदस्य संतोष घुमे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती निर्मितीसाठी वापरली जाणारी विविध प्रकारची माती, साच्यांची निर्मिती, मुक्तहस्त कलाकुसर, मूर्तींना आकर्षक रंगसंगती देण्याची प्रक्रिया तसेच दागिने, डोळे, भुवया आदी सूक्ष्म कलात्मक बाबींचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. याशिवाय विविध चित्रकला व मूर्तीकलेविषयी विद्यार्थ्यांनी ग्रामीण कलाकारांशी संवाद साधून सविस्तर माहिती मिळवली.
यावेळी बोलताना गणेश मूर्तिकार प्रणय घुमे म्हणाले की, “पूर्वी केवळ २५ मूर्तींपासून सुरुवात केलेल्या या व्यवसायात आज २५० ते ३०० गणेश मूर्तींची निर्मिती होत असून ग्राहकांचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे.”
केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात मोठी भरारी घेण्याचे आवाहन करताना, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि आरटीई २००९ नुसार कौशल्याधारित शिक्षणाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले.
मुख्याध्यापिका प्रियंका शिंदे मॅडम यांनी पाठ्यपुस्तकाबाहेरील अनुभवात्मक शिक्षणावर भर देत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारे कौशल्याधिष्ठित शिक्षण दिले. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळाला असून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळाली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.










