तळवणे येथे ‘झोया मरीन’च्या जहाजबांधणी प्रकल्पाची मुहूर्तमेढ; १५ ऑगस्टला भूमिपूजन
पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गाच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या **‘झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’**च्या भव्य जहाजबांधणी प्रकल्पाची मुहूर्तमेढ तळवणे येथे रोवली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा शनिवार, १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता तळवणे, ता. सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षतेखाली हा भूमिपूजन सोहळा होणार आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या जहाजबांधणी प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या विविध संधी निर्माण होऊन कोकणातील औद्योगिक क्षेत्राला अधिक बळ मिळणार आहे.
जहाजबांधणी क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देणे हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश आहे.
१५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या भूमिपूजन सोहळ्याकडे सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागले आहे.










