राजापूर तालुका केमिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल लांजेकर; सचिवपदी रमाकांत मोंडे
: राजापूर येथील सर्वसाधारण सभेत एकमताने निवड; केमिस्ट बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी काम करण्याचा नूतन अध्यक्षांचा निर्धार
राजापूर (प्रशांत पोवार) : राजापूर तालुका केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री. प्रफुल्ल लांजेकर यांची, तर सचिवपदी श्री. रमाकांत मोंडे यांची एकमताने निवड करण्यात आली. राजापूर येथील यशोदिनी मंगल कार्यालयात झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.
तालुका संघटनेचे विद्यमान अध्यक्ष श्री. एजाज भाई पन्हळेकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. प्रदीप वळंजू होते.
सभेत सर्वानुमते श्री. प्रफुल्ल लांजेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. लांजेकर यांच्याकडे यापूर्वी असलेल्या सचिवपदासाठी कात्रादेवी-सागवे विभागातील रिटेलर श्री. रमाकांत मोंडे यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष श्री. प्रफुल्ल लांजेकर यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. संघटनेने दिलेली नवीन जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत केमिस्ट बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच संघटनेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व सदस्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सभेचे आभार प्रदर्शन श्री. मजीद पन्हळेकर यांनी केले. यावेळी राजापूर तालुक्यातील केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.








