उल्लास नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत असगोली क्र. १ शाळेतर्फे गणेशोत्सवात साक्षरता जनजागृती
गुहागर: उल्लास नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत गुहागर केंद्रातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा असगोली नंबर १ च्या वतीने गणेशोत्सवाच्या औचित्याने साक्षरता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाअंतर्गत विविध संदेश देणारे आकर्षक पोस्टर तयार करून रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली.
कोकणात गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून चाकरमानी मोठ्या संख्येने गावी येतात. या काळात गावात साक्षरतेचे पोषक वातावरण निर्माण व्हावे, असाक्षर व्यक्तींना शिकण्याची प्रेरणा मिळावी आणि गावात कोणीही असाक्षर राहू नये, या उद्देशाने जिल्हा शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार, गुहागरचे गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे व शिक्षण विस्तार अधिकारी शिंदे मॅडम यांनी हा उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते.
केंद्रप्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक चंद्रकांत झगडे यांनी साक्षरता जनजागृती फेरीचे अत्यंत नियोजनबद्ध आयोजन केले. या फेरीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, याद्वारे असगोली गावातील सर्व नवसाक्षरांपर्यंत पोहोचणे शक्य झाले.
या जनजागृती फेरीत रोहिणी गुरव, स्नेहा सकपाळ, दीपक गुरव, देवेंद्र गुरव, दिव्यता पालशेतकर, सानवी कावणकर, तंत्रस्नेही शिक्षक प्रदीप पवार, संदीप गुरव, विनया गुरव यांच्यासह गावातील युवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गुहागर केंद्रातील सर्वच शाळांमध्ये गणेशोत्सवात असे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, या स्तुत्य उपक्रमाबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.












