पनवेल टाईम्सच्या ‘सौंदर्य स्वप्न सुंदरी’ पुरस्काराने कु. शौर्या जाधवचा गौरव
अडीच वर्षांच्या चिमुकलीने मॉडलिंग स्पर्धेत मिळवले यश; देवदत्त घरत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान 
प्रतिनिधी (मंगेश जाधव) :
पनवेल टाईम्स आयोजित ‘सौंदर्य स्वप्न सुंदरी’ सिझन २०२६ या मॉडलिंग स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील मौजे लोवले गावची अडीच वर्षांची चिमुकली कु. शौर्या स्नेहल अमर जाधव हिने उल्लेखनीय यश संपादन केले. छोट्या वयोगटातून तिने ‘सौंदर्य सुंदरी’ हा पुरस्कार प्राप्त केल्याने तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या मॉडलिंग स्पर्धेत विविध वयोगटातील एकूण सुमारे २५ मुली व महिलांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अडीच वर्षांच्या छोट्या वयोगटातून शौर्या जाधव हिने आपल्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकत पुरस्कारावर आपले नाव कोरले.
मॉडलिंग कोरिओग्राफर मा. देवदत्त घरत यांच्या शुभहस्ते शौर्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर, आयोजक व नागरिक उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप शिल्ड, क्राउन आणि ‘सौंदर्य सुंदरी’चा पट्टा असे होते.
विशेष म्हणजे, एवढ्या कमी वयात शौर्याने मॉडलिंग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन तसेच ‘सिझन १३ किड्स फॅशन मॉडलिंग’ यांसारख्या उपक्रमांमध्येही ती सहभागी होत असून जाहिरातींसाठी तिला संधी मिळाली आहे.
या कार्यक्रमाला रायगडचे पालकमंत्री ना. भरतशेठ गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, महापौर नितीन पाटील, प्रीतम म्हात्रे, अरविंद म्हात्रे तसेच महाराष्ट्राची लावणी क्वीन हिंदवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पनवेल टाईम्सचे सर्व पदाधिकारी व आयोजक यावेळी उपस्थित होते.
शौर्या जाधव हिने मिळवलेल्या या यशाबद्दल लोवले गावासह संगमेश्वर तालुक्यातून तिचे अभिनंदन होत असून, भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.












