विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीतून विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधावा : उपसभापती निलेश सुर्वे
गुहागर केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत विविध शैक्षणिक उपक्रमांवर मार्गदर्शन; गुणवंत शिक्षक व नवनियुक्त शिक्षण सेवकांचा गौरव

गुहागर | प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षण हा उच्च शिक्षणाचा पाया असून, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणे आवश्यक आहे. इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा, नासा-इस्रो परीक्षा, मिशन लोकशाही परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षा आदी विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधावा, असे प्रतिपादन गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांनी केले.
गुहागर येथील श्री अन्नपूर्णा वैद्य विद्यालयात गुहागर केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत मार्गदर्शन करताना निलेश सुर्वे बोलत होते. प्राथमिक शिक्षण हाच उच्च शिक्षणाचा खरा पाया असल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व गुणवत्तापूर्ण विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यास आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शिक्षण परिषदेचे उद्घाटन निलेश सुर्वे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. शिक्षण विस्तार अधिकारी सारिका शिंदे यांनी सरस्वती देवी व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुहागर नंबर एक शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक ईश्वर वसावे होते.
यावेळी केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील, अन्नपूर्णा विद्यालयाचे मुख्याध्यापक समीर गुरव, गुहागर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुजाता कांबळे, केंद्र मुख्याध्यापिका मनीषा शिंदे, विषय शिक्षक शिवानंद साखरे, रीड टू रूमचे गुहागर तालुका समन्वयक रामटेके सर यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व शिक्षक उपस्थित होते.
विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
परिषदेत असगोली नंबर एक शाळेचे तंत्रशिक्षक प्रदीप पवार यांनी ऑनलाइन कामकाज व पीजीआय मानांकनाबाबत मार्गदर्शन केले. बागल मॅडम यांनी गणित विषयाच्या सक्षमीकरणाबाबत विविध उदाहरणांच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन केले.
गुहागर हायस्कूलचे वैभव ढोणे यांनी इंग्रजी विषयातील विद्यार्थी-अंतःक्रियेबाबत सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले. आरे-भंडारवाडा शाळेचे देशमुख सर यांनी ‘निपुण महाराष्ट्र’ अंतर्गत शासनाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.
आदर्श शिक्षकांचा गौरव
गुहागर हायस्कूलचे मधुकर गंगावणे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल, तर गुहागर नंबर एक शाळेचे अष्टपैलू शिक्षक अमोल धुमाळ यांना पंचायत समिती गुहागर शिक्षण विभागाचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
नवनियुक्त शिक्षण सेवकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यांनी यावेळी आपला परिचय करून दिला. तसेच असगोली नंबर दोन शाळेच्या शिक्षिका प्रियंका शिंदे यांची पवित्र पोर्टलद्वारे सातारा जिल्हा परिषदेत निवड झाल्याबद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षकांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
शैक्षणिक गुणवत्तावाढीबाबत समाधान
शिक्षण विस्तार अधिकारी सारिका शिंदे यांनी उपस्थित सर्व शिक्षकांचे आभार मानत गुणवत्ता क्षेत्रात शिक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले. केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील यांनी प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेत शैक्षणिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ईश्वर वसावे यांनी शिक्षण परिषद यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल अन्नपूर्णा विद्यालयाचे मुख्याध्यापक समीर गुरव व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. तज्ज्ञ मार्गदर्शकांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. गुहागर केंद्राने गुणवत्ता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सर्वगुणसंपन्न शिक्षक राजू जानू सुर्वे यांनी केले.












