साटवलीत भरदिवसा बिबट्याचा वावर; मुस्लिमवाडी, बौद्धवाडीत भीतीचे वातावरण!

साटवलीत भरदिवसा बिबट्याचा वावर; मुस्लिमवाडी, बौद्धवाडीत भीतीचे वातावरण!

शेळीवर बिबट्याचा हल्ला करून ठार; ग्रामस्थ आणि पशुपालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी

लांजा (प्रतिनिधी) : जितेंद्र चव्हाण

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील साटवली गावातील मुस्लिमवाडी आणि बौद्धवाडी परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. भरदिवसा तसेच रात्रीच्या वेळी बिबट्या मुख्य रस्त्यावरून फिरताना दिसत असल्याने ग्रामस्थ आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी साटवलीतील ग्रामस्थ आणि स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

 

मुख्य रस्त्यावरच बिबट्याचा वावर

 

साटवलीतील मुस्लिमवाडी आणि बौद्धवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन वारंवार होत आहे. दुपारी दोनच्या सुमारास तसेच रात्रीच्या वेळी बिबट्या मुख्य रस्त्यावरून मुक्तपणे फिरताना दिसत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळी रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. शेतकरी, महिला आणि इतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दैनंदिन कामांसाठी बाहेर पडणेही जिकिरीचे बनले आहे.

 

शेळीवर हल्ला करून ठार; पशुपालक चिंतेत

 

काही दिवसांपूर्वी याच परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेळीवर बिबट्याने दिवसाढवळ्या हल्ला केला. या हल्ल्यात शेळी ठार झाली असून बिबट्याने तिला जंगलात ओढून नेल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरातील पशुपालक आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

गुरांना चरायला नेणे, चाऱ्याची व्यवस्था करणे तसेच शेतीची कामे करताना बिबट्याच्या हल्ल्याची भीती ग्रामस्थांना सतावत आहे. मानवी वस्तीजवळ आणि मुख्य रस्त्यावर बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

 

वनविभागाला माहिती; तातडीच्या कारवाईची मागणी

 

या परिस्थितीची माहिती लांजा तालुका वनाधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे देण्यात आली आहे. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेता वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने संबंधित परिसरात पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच वन्यजीव तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे.

साटवलीतील मुस्लिमवाडी आणि बौद्धवाडी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभाग आता कोणती पावले उचलणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें