उद्धव ठाकरेंची मोठी खेळी; डिलिमिटेशन बिलापूर्वी ६ बंडखोर खासदारांना व्हीप, असीम सरोदेंची प्रतिक्रिया
मुबई -( प्रतिनिधी)
आगामी डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) बिलाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठी राजकीय खेळी खेळली आहे. पक्षातून फुटून गेलेल्या ६ बंडखोर खासदारांना उद्धव ठाकरे गटाकडून अधिकृत ‘व्हीप’ (पक्षादेश) बजावण्यात आला आहे. या राजकीय घडामोडीवर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली असून, बंडखोर खासदारांवर थेट कायद्याचा बडगा उगारला जाण्याचे संकेत दिले आहेत.
नेमकं काय म्हणाले असीम सरोदे?
पुण्यात माध्यमांशी बोलताना असीम सरोदे यांनी या खासदारांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. ते म्हणाले की, “शिवसेनेतून ‘मशाल’ चिन्हावर निवडून आलेले हे ६ खासदार केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शिंदे सेनेत जाऊन मिळाले आहेत.”
डिलिमिटेशन बिलापूर्वी बजावण्यात आलेल्या या व्हीपमुळे आता या खासदारांची मोठी कायदेशीर कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षात राहून किंवा चिन्हावर निवडून आल्यानंतर पक्षादेशाचे उल्लंघन केल्यास या खासदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे संकेत सरोदे यांच्या विधानातून मिळत आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा कायदेशीर आणि राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.













