💔 रत्नागिरीची सेजल कदमची अकाली ‘एक्झीट’
नृत्य व चित्रपटात दाखवली चमक; अल्पशा आजाराने निधन
रत्नागिरी :-
रत्नागिरीची नृत्यामध्ये पारंगत आणि चित्रपटातील छोट्या भूमिकांमधून स्वतःची ओळख निर्माण करणारी सेजल मिलिंद कदम हिचे अल्पशा आजाराने शनिवारी सकाळी निधन झाले. कोल्हापूर येथे उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
सेजल ही रत्नागिरीतील पोलीस अधीक्षक कार्यालयात सेवेत असलेल्या मिलिंद कदम व कोमल कदम दाम्पत्याची कन्या होती. पंधरा दिवसांपूर्वी अचानक तब्येत बिघडल्याने तिला उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच तिचे निधन झाले.
लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड होती. शालेय जीवनापासूनच नृत्याचे शिक्षण घेत ती गेल्या दहा वर्षांपासून विविध नृत्य प्रकारांमध्ये पारंगत झाली होती. मुंबई, कोल्हापूर, गोवा येथे तिने अनेक नृत्यप्रयोग केले होते. तसेच, वर्षभरापूर्वी दोन छोट्या चित्रपटांमधूनही तिने भूमिका साकारल्या होत्या.
तिच्या निधनाची बातमी समजताच सन्मित्रनगर येथील निवासस्थानी मित्रपरिवार, नातेवाईक तसेच पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी धाव घेतली. शनिवारी दुपारी तिच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनासाठी नेण्यात आले असता शोककल्लोळ उसळला.
🔖 हॅशटॅग्स
#रत्नागिरी #SejalKadam #नृत्यांगना #अल्पशानिधन #RatnagiriVartaha















