आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
आहिल्यानगर जिल्ह्यावर शोककळा, पत्रकार सुरक्षा समिती व मित्रमंडळाकडून श्रद्धांजली
आहिल्यानगर (प्रतिनिधी – नंदकुमार बगाडे पाटील):
आमदार शिवाजीराव कर्डिले (वय ६९) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण आहिल्यानगर जिल्ह्यावर शोककळा पसरली असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या निधनामुळे कर्डिले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनानंतर पारगाव सुद्रिक येथे आहिल्यानगर जिल्हा पत्रकार सुरक्षा समिती आणि नंदकुमार बगाडे मित्रमंडळ यांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आमदार कर्डिले यांच्या कार्याची उजळणी करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आमदार शिवाजीराव कर्डिले हे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते आणि सध्या ते राहुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात श्रीमंत-गरीब असा भेदभाव न करता सर्व कार्यकर्त्यांशी समान वागणूक दिली.
ते आहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन होते तसेच महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातही जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
















