🌸 दापोलीत काव्य व गझल संमेलन उत्साहात संपन्न 🌸
उर्दू-मराठी साहित्यातील दिग्गज कवींचा प्रभावी सहभाग
दापोली : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल, दापोली आणि ललित कला फाउंडेशन, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगल कार्यालयात नुकतेच काव्य व गझल संमेलन उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शीतल मालुसरे उपस्थित होत्या.
संमेलनाची सुरुवात शाळेचे माजी शिक्षक तथा ख्यातनाम उर्दू-मराठी गझलकार बदीऊजमा खावर यांच्या स्मृतींना आदरांजली वाहात त्यांच्या गझल-काव्याच्या वाचनाने झाली.
उर्दू साहित्यातील दिग्गज मंजर खयामी, जमालुद्दीन बंदरकर, बदरुद्दीन बदर, बशीर अहमद बशीर, सलमान मोमीन, रिजवान कारीगर आणि जियाऊरहमान खान जिया यांनी अप्रतिम मुशायरा सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
मराठी व हिंदी साहित्यिकांमध्ये प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, कैलाश गांधी, रेखा जगरकर आदींनी आपल्या रचना प्रभावीपणे सादर केल्या. शाळेतील विद्यार्थ्यांनीही कविता व गझलांचे सुंदर पठण करून प्रेक्षकांचे मन जिंकले.
अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे म्हणाले, “शिक्षक-विद्यार्थ्यांनी ग्रंथसंपदेचे वाचन करून काव्य-गझलांची नवनिर्मिती करावी आणि या भाषांना पुन्हा चकचकित करावे.”
समारोपात इकबाल परकार यांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल मुख्याध्यापक अय्युब मुल्ला व सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच, अशा साहित्यिक संमेलनांचे आयोजन वारंवार व्हावे, जेणेकरून विद्यार्थ्यांत साहित्याची गोडी निर्माण होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.















