पती बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष, मी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी स्वीकारली तर यात चूक कुठे? – सौ. पारिजात पराग कांबळे यांची रोखठोक भूमिका
आबलोली (संदेश कदम)
गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी केलेल्या चर्चा–टिकावर सौ. पारिजात पराग कांबळे यांनी सरळ, रोखठोक आणि मुद्देसूद उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली.
विरोधकांनी असा सवाल उपस्थित केला होता की, “आपले पती पराग कांबळे बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि आपण ठाकरे सेनेच्या तिकिटावर नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहात, याबाबत भूमिका काय?”
या प्रश्नाला उत्तर देताना सौ. कांबळे म्हणाल्या :
“मी महाविकास आघाडी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवीत आहे. माझे पती पराग कांबळे बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत, हेही तितकंच खरं आहे. पण भारत हा लोकशाही देश आहे. कुणाला कोणत्या पक्षात राहायचं, काम करायचं, हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. हा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातून आपल्याला लाभला आहे. मग माझ्या पतींनी वेगळ्या पक्षात काम करणं आणि मी शिवसेनेतून उमेदवारी स्वीकारणं यात गैर काय?”
त्या पुढे म्हणाल्या की, नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेताना त्यांनी सर्वात आधी घरच्यांचा, विशेषतः पतींचा सल्ला आणि संमती घेतली.
“मी उमेदवारी स्वीकारायच्या आधी माझ्या घराला, घरातील माणसांना प्राधान्य दिलं. त्यांची संमती घेतली आणि त्यानंतरच मी या पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली. आज बघितलं तर प्रत्येक घरात कितीतरी मतं, विचार, पक्ष असतात. याचा देखील विचार करायला हवा,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
“मागच्या वेळी पाठबळ कमी होतं, आज आमदारांचा भक्कम पाठिंबा आहे”
मागील निवडणुकांत संधी हुकल्यानंतर यावेळी थेट नगराध्यक्षपदासाठी उभ्या राहिलेल्या सौ. पारिजात कांबळे यांना “यावेळी कोणत्या मुद्द्यांवर प्रचार करणार आणि कोणाचा पाठिंबा आहे?” असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या :
“मी दोन वेळा निवडणुकीत उभी राहिले. त्या वेळी माझ्या मागे भक्कम पाठबळ नव्हतं. पक्ष होता, पण स्थानिक पातळीवर आमदारांचे ठोस नेतृत्व नव्हते. माझी तेव्हापासूनची एकच इच्छा होती – गुहागर तालुक्याला शिवसेनेचे आमदार असावेत. आज माननीय भास्करशेठ जाधव आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या आशीर्वादानेच मी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवीत आहे. पक्षीय पाठिंबा आणि आमदारांचे नेतृत्व, याचा नक्कीच फायदा होईल याची मला खात्री आहे.”
“रस्ता, पाणी, वीज, पर्यटन – गुहागरचा सर्वांगीण विकास हा आमचा व्हिजन”
“नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर गुहागर शहराचा काय पालट करणार?” असा प्रश्न विचारल्यावर सौ. कांबळे म्हणाल्या की, या विषयावर त्यांनी यापूर्वीही सविस्तर मुलाखत दिलेली असून, गुहागर शहराच्या मूलभूत समस्या आणि त्या सोडवण्यासाठीचा स्वतःचा ठोस व्हिजन असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
“आज गुहागरमध्ये रस्त्यांचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, विजेच्या सुविधा आणि पर्यटनाच्या दृष्टीनेही अनेक अडचणी आहेत. नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर पहिल्या काळात माननीय आमदार भास्करशेठ जाधव यांनी अनेक सुविधा गुहागरला आणल्या. पण त्यानंतर काय झालं हे आपण सगळेच पाहत आहोत. आता भूतकाळात काय चुकलं, कोण चुकलं यावर वेळ न घालवता ‘नवं काय करता येईल’ यावर आम्ही भर देणार आहोत.”
त्या पुढे म्हणाल्या :
“नवीन योजना, नवीन सुधारणा, आणि गुहागर शहर विकासाच्या दृष्टीने कसं पुढे नेता येईल यासाठी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार आणि मी स्वतः नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून निर्धार केलेला आहे. आमचा स्वतःचा स्पष्ट व्हिजन आहे, आणि त्या व्हिजनवर काम करण्यासाठीच मी समोर आले आहे,” असा ठाम उच्चार सौ. पारिजात पराग कांबळे यांनी केला.
या रोखठोक भूमिकेमुळे “पती वेगळ्या पक्षात – पत्नी ठाकरे गटात” या मुद्द्यावरून रंगलेल्या चर्चांना सौ. पारिजात पराग कांबळे यांनी स्पष्ट उत्तर दिल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीच्या पाठबळासह व आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वात त्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत असून, गुहागरच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप घेऊनच मी मतदारांसमोर जात असल्याचा त्यांचा दावा आहे.
















