‘कोकणारत्न’ सन्मानाने समाजसेविका वर्षा चव्हाण यांचा गौरव
मुंबई : स्वातंत्र्य कोकणराज्य अभियानाच्या वतीने कोकणातील सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय क्षेत्रात उल्लेखनीय व भरीव कार्य करणाऱ्या समाजसेविका कु. वर्षा विनायक चव्हाण यांना ‘कोकणारत्न’ या मानाच्या सन्मानाने गौरविण्यात आले. हा सन्मान सोहळा मंगळवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई येथे उत्साहात पार पडला.
स्वातंत्र्य कोकणराज्य अभियानाचे संस्थापक व अध्यक्ष श्री. संजय धाकू कोकरे यांच्या हस्ते कु. वर्षा चव्हाण यांना ‘कोकणारत्न’ मानद पदवीचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांच्या निःस्वार्थ समाजकार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला.
कु. वर्षा चव्हाण यांनी संपूर्ण कोकणात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे भरीव योगदान दिले आहे. महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवणे, आरोग्य व व्यसनमुक्तीसाठी जनजागृती, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन, नियमित रक्तदान शिबिरे, गरजू रुग्णांना मदत तसेच वंचित घटकांसाठी शैक्षणिक व वैद्यकीय सहाय्य अशी त्यांची बहुआयामी कामगिरी उल्लेखनीय आहे.
या सन्मानामुळे कु. वर्षा चव्हाण यांच्यावर कोकणासह राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याला अधिक बळ मिळाले आहे. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















