💥 गुहागर – जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपअभियंता ७ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडला
💥 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई
गुहागर :
जिल्हा परिषद बांधकाम विभाग, गुहागर येथे कार्यरत असलेले उपअभियंता (वर्ग-१) संजय तुळशीराम सळमाखे यांना बांधकाम कामाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगहाथ पकडले. ही कारवाई मंगळवार, १६ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली.
तक्रारदार हे एका बांधकाम ठेकेदाराकडे सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. ठेकेदाराने केलेल्या कामाचे प्रथम देयक तयार झाले होते. सदर देयक तसेच देयकासोबत जोडलेल्या कामांच्या फोटोंवर स्वाक्षरी करण्यासाठी उपअभियंता संजय सळमाखे यांची स्वाक्षरी आवश्यक होती.
तक्रारदार १२ डिसेंबर २०२५ रोजी देयकावर स्वाक्षरी घेण्यासाठी सळमाखे यांच्या कार्यालयात गेले असता, उपअभियंता सळमाखे यांनी देयकावर व कामाच्या फोटोंवर स्वाक्षरी करण्यासाठी ७ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या मागणीबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार एसीबीने सापळा रचला. १६ डिसेंबर २०२५ रोजी, उपअभियंता सळमाखे यांनी तक्रारदाराकडून सात हजार रुपयांची लाच स्वीकारली. ही रक्कम स्वीकारल्यानंतर, गुहागर येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयातील त्यांच्या दालनात एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात येत आहे.
—















