गुहागर तालुक्यात पडवे उर्दू केंद्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

गुहागर – तवसाळ | प्रतिनिधी : सचिन कुळये
गुहागर तालुक्यातील पडवे उर्दू केंद्रीयच्या दोन दिवसीय हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन दिनांक १६ व १७ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, कुडली नं. १ येथे करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये केंद्रीय अंतर्गत सर्व शाळांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे.
या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी कुडली गावातील ग्रामस्थ, पालक व महिला मंडळ यांनी उत्कृष्ट नियोजन केले असून, बाहेरून आलेल्या क्रीडा रसिकांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. विशेषतः तवसाळ तांबडवाडी व बाबरवाडी येथील शिक्षणप्रेमी पालक, ग्रामस्थ आणि महिला मंडळांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कार रुजावेत, शारीरिक व मानसिक विकास व्हावा, तसेच शाळेसोबत गावाचे नाव उज्ज्वल व्हावे या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना, संघभावना व आत्मविश्वास वाढताना दिसून येत आहे.
दोन दिवसीय या हिवाळी क्रीडा स्पर्धेत पडवे उर्दू केंद्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेचा ‘चॅम्पियन’ 🏆 किताब कोणत्या शाळेला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.














