‘मासू’च्या श्री सोमेश्वर सालबाई क्रीडा नगरीत खेळाडूंचा रणसंग्राम; केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
यजमान मासू शाळेच्या नियोजनाचे कौतुक; लोकसहभाग आणि ग्रामस्थांच्या मेहनतीतून क्रीडा महोत्सव यशस्वी
गुहागर (प्रतिनिधी):
तालुक्यातील केंद्र शीर अंतर्गत येणाऱ्या ‘केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६’ नुकत्याच जिल्हा परिषद आदर्श शाळा मासू नं. १ (श्री सोमेश्वर सालबाई ग्रामदेवता क्रीडा नगरी) येथे अत्यंत दिमाखदार सोहळ्यात पार पडल्या. खेळाडूंचा उत्साह आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे या स्पर्धेने खेळाचे भव्य स्वरूप धारण केले होते.
यजमान ग्रामस्थांचे सुयोग्य नियोजन
या क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी यजमान ग्रामविकास मंडळ मासू च्या पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. मंडळाचे अध्यक्ष विजय मसुरकर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष अशोक मास्कर, सरचिटणीस सुधाकर मास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा नगरीची उभारणी करण्यात आली होती. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश मास्कर, उपाध्यक्ष उज्वला नाचरे यांच्यासह सिमरन नाचरे, सुनील नाचरे, पांडुरंग नाचरे, महादेव नाचरे आणि विविध वाडीप्रमुखांनी मैदानी व्यवस्था चोख ठेवली.
शिक्षक वृंद व देणगीदारांचा मोलाचा वाटा
स्पर्धेच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय यशामागे शाळेचे मुख्याध्यापक श्री. रवींद्र कुळये सर तसेच वाकडे सर, उजळे सर आणि उकार्डे मॅडम यांनी घेतलेली मेहनत फळाला आली. अनेक दानशूर देणगीदारांनी आर्थिक आणि वस्तू स्वरूपात दिलेल्या मदतीमुळे खेळाडूंना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य झाले.
उत्साहपूर्ण वातावरण
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये केंद्रातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपला क्रीडा टॅलेंट दाखवला. ग्रामस्थ बंधू-भगिनी आणि क्रीडा रसिकांच्या उपस्थितीने खेळाडूंचा आत्मविश्वास द्विगुणित झाला होता. ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जि. प. आदर्श शाळा मासू नं. १ ने केलेले प्रयत्न आदर्शवत ठरले आहेत.
या यशस्वी आयोजनाबद्दल केंद्र स्तरावरून आणि शिक्षण विभागाकडून मासू ग्रामस्थ व शिक्षक वृंदाचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.















