श्रीरामपूर शहरात बिबट्या पकडण्यात यश; नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास
अहिल्यानगर | प्रतिनिधी : नंदकुमार बगाडे
श्रीरामपूर शहरातील गणपती मंदिर, बोंबले वस्ती, अक्षय कॉर्नर आगाशी नगर तसेच आमदार ओगले यांच्या घराच्या पाठीमागील भागात पाण्याच्या टाकी परिसरात वावरणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या पथकाने पिंजऱ्यात जेरबंद केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात तीन ते चार बिबटे वावरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
काही दिवसांपूर्वी बिबट्याने श्रीरामपूर शहरात दहशत माजवली होती. त्यामुळे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी हैराण झाले होते. भीतीपोटी अनेक विद्यार्थ्यांनी शाळेकडे जाणे टाळले होते. दरम्यान, पाण्याच्या टाकी परिसरात बिबट्या वावरत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तातडीने वनाधिकाऱ्यांना माहिती दिली. वन विभागाने तत्काळ कारवाई करत पिंजरा लावला आणि त्यामध्ये बिबट्या अडकला.
या यशस्वी कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असून, श्रीरामपूर वन विभागाचे आभार व अभिनंदन व्यक्त केले जात आहे. काही दिवसांपूर्वी या संदर्भातील बातमी दैनिकात प्रसिद्ध केल्याने या कारवाईला यश मिळाल्याचे सांगत प्रतिनिधी पत्रकार आनंदकुमार वगडे यांचेही सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. पत्रकार नंदकुमार बगाडे यांनीही वनाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
मात्र, परिसरात अजूनही बिबट्यांचा वावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बोंबले वस्तीतील महाडा कॉलनी ते हॉटेल द्रवांकुर दरम्यान घनदाट जंगल, वेड्या बाभळीची झाडी व मोठे खड्डे असून, बिबटे लपण्यासाठी या ठिकाणांचा वापर करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी दिवसा ढवळ्या अडीच ते तीनच्या सुमारास काम सुरू असताना घनदाट झाडीत बिबट्या दिसून आल्याची घटनाही समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर वनाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून धोकादायक झाडे-झुडपे व घनदाट बाभळीची झाडी नष्ट करावी तसेच ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
















