सलग सुट्टीचा हंगाम कोंडीने सुरू; मुंबई–गोवा महामार्ग व द्रुतगती मार्गावर भीषण वाहतूक जाम
नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळांकडे ओढा; रायगडमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी
नवी मुंबई (मंगेश जाधव) – नाताळचा सण आणि सलग आलेल्या सुट्ट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबई व ठाणे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने मुंबई–गोवा महामार्गासह मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली. एकाच वेळी हजारो वाहने रस्त्यावर उतरल्याने वाहतुकीचे नियोजन कोलमडले.
सलग सुट्ट्यांमुळे मुंबईकरांची पावले कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांकडे वळली आहेत. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले असून, याचा थेट परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर झाला आहे.
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी सकाळपासून खालापूर टोलनाका ते लोणावळा एक्झिटदरम्यान घाट परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सात ते आठ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तासांचा वेळ लागत होता. संथ वाहतुकीमुळे अनेक वाहने घाटात नादुरुस्त होण्याच्या घटना घडल्या.
दुसरीकडे मुंबई–गोवा महामार्गावर पेण ते वडखळ दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही बेशिस्त वाहनचालकांनी मार्गिकेचे नियम न पाळल्याने कोंडी आणखी तीव्र झाली. वडखळ ते अलिबाग मार्गावरही वाहतूक संथ गतीने सुरू होती. अचानक वाढलेल्या वाहनसंख्येमुळे वाहतुकीचे नियंत्रण राखणे पोलिसांसमोर आव्हान ठरले.
रायगडमध्ये पर्यटनाला सुगीचे दिवस
नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात पर्यटन हंगाम जोमात आला आहे. हजारो पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले असून समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. वाढत्या गर्दीमुळे हॉटेल, होमस्टे, वाहतूक व पर्यटन व्यवसायाला चांगलीच सुगी आली आहे.















