शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयाचे अविष्कार: 2025 मध्ये घवघवीत यश
आबलोली (संदेश कदम)
डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली यांचेकडून आयोजित करण्यात आलेल्या अविष्कार – 2025 या संशोधनात्मक स्पर्धेमध्ये चिपळूण तालुक्यातील खरवते – दहिवली मधील शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयातील 6 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. अविष्कार ही संशोधनात्मक स्पर्धा असुन या स्पर्धेच्या माध्यमातून कृषि विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक विचारांना सादरीकरणासाठी उत्तम व्यासपीठ दिले जाते .याच माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक गुणांना वाव दिला जातो.या स्पर्धेमध्ये कोकण कृषि विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयामधील सुमारे एकशे आठ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामधुन शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयामधील कु.स्वयम दळी व कुमारी सानिया माने यांनी वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतून प्रथम क्रमांक मिळवला. कु. स्वयंभू मेस्त्री व कु.उत्कर्ष पाटणकर हे या महाविद्यालयाचे उद्यानविद्या शाखेचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यी असुन त्यांनी शुद्ध शास्त्र शाखेतून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कुमारी मिली शेलार व कु. साक्षी महाडीक यांनी औषध शास्त्र शाखेतून द्वितीय क्रमांक मिळवत दैदीप्यमान यश संपादन केले.या सर्व विद्यार्थ्यांनी डीटोक्स केअर ,न्यु ट्री कोअर,विड टु वंडर फुड या नाविन्यपूर्ण संशोधनातुन सर्व मान्यवरांचे लक्ष वेधले तसेच या सर्व प्रकल्पांचे व्यावसायिक महत्व उपस्थितांसमोर उत्तम रित्या सादर केले.या यशस्वी कामगिरीबद्दल सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी सर्व विजेते व सहभागी स्पर्धकांचे विशेष कौतुक केले व त्यांना पुढील संशोधनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील व प्रा.रवींद्र माने यांचे सखोल मार्गदर्शन लाभले.या दैदीप्यमान यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतुन विशेष कौतुक होत आहे.















