पारगाव सुद्रिक येथील पोस्टमन जाकीर बाबुलाल शेख यांचे हृदयविकाराने निधन
पारगाव सुद्रिक (श्रीगोंदा):
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील ज्येष्ठ पोस्टमन जाकीर बाबुलाल शेख (वय ५७) यांचे बुधवारी दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे १२.३० वाजता तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
जाकीर शेख यांनी गेले ४० ते ४५ वर्षे पारगाव सुद्रिक येथे पोस्ट खात्यामध्ये पोस्टमन म्हणून प्रामाणिक सेवा बजावली. “पोस्टमन जाकीर शेख” या नावाने ते लहानथोरांमध्ये परिचित होते. सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत कोणताही भेदभाव न करता, अत्यंत शांत व मनमिळावू स्वभावाने त्यांनी सेवा केली.
नोकरीसोबतच त्यांनी भाजीपाला व्यवसायही सुरू ठेवला होता. त्यांच्या निधनामुळे पारगाव सुद्रिक व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, समाजात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे, असे मत पत्रकार नंदकुमार बगाडे यांनी व्यक्त केले.
त्यांच्या अंत्यविधीप्रसंगी विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी पंचायत समिती सदस्य शहाजी हिरवे, माजी उपसरपंच राजेंद्र मोठे, शिवाजीराव ननवरे, बाळासाहेब खेतमाळीस, सुरेश खेतमाळीस, अतुल दानवे पाटील, माऊली शेठ हिरवे, सामाजिक कार्यकर्ते, माजी सरपंच गोविंद शेठ हिरवे, आदेश तुळशे, सुरेश जाधव, स्वप्निल बगाडे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश घोडके, रमेश मोटे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
—
वृत्तांकन : नंदकुमार बगाडे पाटील















