नागरिकांनी माहिती अधिकार कायद्याचा पुरेपूर वापर करावा – तालुका अध्यक्ष जितेंद्र चव्हाण
माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन लांजा तालुक्याची सभा उत्साहात संपन्न
लांजा | प्रतिनिधी
माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन, लांजा तालुक्याची महत्त्वपूर्ण सभा जिल्हा अध्यक्ष श्री. मनोहर गुरव यांच्या सूचनेनुसार गवाणे येथील जिल्हा उपाध्यक्ष श्री. आनंद कांबळे यांच्या गंगा निवासस्थानी दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडली.
ही सभा लांजा तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे अध्यक्ष श्री. जितेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
सभेमध्ये माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुक्यात व्यापक जनजागृती करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. नागरिकांना त्यांच्या हक्कांची माहिती, अर्ज करण्याची योग्य प्रक्रिया, कालमर्यादा, अपील पद्धत तसेच कायद्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी कार्यशाळा, डिजिटल मोहिमा आणि स्थानिक पातळीवर प्रचार करणे गरजेचे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष जितेंद्र चव्हाण म्हणाले की, “माहिती अधिकार कायदा हा शासन व्यवस्थेत पारदर्शकता आणणारा, भ्रष्टाचाराला आळा घालणारा आणि नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत सक्रिय करणारा प्रभावी कायदा आहे. प्रत्येक नागरिकाने या कायद्याचा पुरेपूर वापर करून प्रशासनावर सकारात्मक दबाव निर्माण केला पाहिजे.”
सभेतील प्रमुख मुद्दे :
माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व व उद्देश
नागरिकांचे हक्क – सरकारी कागदपत्रांची माहिती, तपासणी व नमुने घेण्याचा अधिकार
अर्ज करण्याची प्रक्रिया – संबंधित विभागाच्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे (PIO) साध्या कागदावर किंवा ऑनलाइन अर्ज
माहिती मिळण्याची कालमर्यादा – सामान्य प्रकरणात ३० दिवस, तर जीवन-मरणाशी संबंधित माहिती ४८ तासांत
अपील प्रक्रिया – प्रथम अपील व त्यानंतर राज्य माहिती आयुक्ताकडे दुसरे अपील
कायद्यातील अपवाद (कलम ८ व ९) यांची माहिती
जनजागृतीसाठी ठरविण्यात आलेल्या उपाययोजना :
सोशल मीडिया व डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर
ग्रामसभा, शाळा व महाविद्यालयांमध्ये कार्यशाळांचे आयोजन
माहितीपत्रके व मार्गदर्शक साहित्याचे वितरण
यशस्वी RTI प्रकरणांच्या उदाहरणांद्वारे नागरिकांना प्रेरित करणे
सभेला आनंद कांबळे (जिल्हा उपाध्यक्ष), राजेंद्र कांबळे (सचिव), शिवाजी जाधव (सक्रिय कार्यकर्ता) तसेच लांजा तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे सर्व पदाधिकारी व तालुका कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेमुळे तालुक्यात माहिती अधिकार कायद्याबाबत जनजागृतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.















