पत्रकार घरकुल योजनेसाठी 26 जानेवारी रोजी लाक्षणिक आंदोलनाचा इशारा
राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक
सोलापूर (प्रतिनिधी):
पत्रकारिता ही केवळ नोकरी नसून समाजासाठीची चळवळ आहे. समाजातील वंचित, शोषित आणि अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणीद्वारे लढा देणारा पत्रकार आज स्वतः मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक पत्रकारांना आजही स्वतःच्या मालकीचे पक्के घर नाही, ही गंभीर बाब लक्षात घेता पत्रकार घरकुल योजनेसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीने 26 जानेवारी रोजी लाक्षणिक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष यशवंतराव पवार यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार आजही भाड्याच्या घरात राहत असून अल्प मानधन, तुटपुंज्या जाहिराती आणि अस्थिर आर्थिक परिस्थितीमुळे स्वतःचे घर घेणे त्यांना शक्य झालेले नाही. कोरोना महामारीसारख्या अत्यंत कठीण काळात पत्रकारांनी स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता, जीव धोक्यात घालून शासनाचे आदेश, सूचना आणि जनहिताची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे राष्ट्रीय कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले. मात्र असे असूनही पत्रकार घरकुल योजनेपासून आजही वंचित राहिले आहेत.
याच पार्श्वभूमीवर पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने दिनांक 18 जून 2025 रोजी सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून स्वतःच्या मालकीचे घर नसलेल्या पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच 12 सप्टेंबर 2025 रोजी पुणे येथे विभागीय आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी निवेदन देण्यात आले होते.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतानाही केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांपासून तो दुर्लक्षित राहिला आहे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता सामाजिक बांधिलकीतून काम करणारा पत्रकार आजही घरकुल योजनेपासून वंचित आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजना अंतर्गत स्वतःचे पक्के घर मिळावे, यासाठी पत्रकार सुरक्षा समितीने सातत्याने पाठपुरावा केला असून आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येणार आहे.
राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असून या हक्काच्या लढ्यात जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष राम हुंडारे, जिल्हा सचिव अंबादास गज्जम, धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष झाकीर शेख, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष अमित राठोड, सोलापूर शहराध्यक्ष आन्सर तांबोळी (बी.एस.), कार्यकारी अध्यक्ष वसीमराजा बागवान, कार्याध्यक्ष राजू वग्गू, समन्वयक लक्ष्मण सुरवसे, सचिव रमेश दग्गारी, प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी, दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद, व्यंकटेश गज्जम यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
बातमी – नंदकुमार बागडेपाटील















