पडवे पंचायत समिती गणात अपक्ष उमेदवार आघाडीवर , तरुणांची लाट आनंद भोजने यांच्या बाजूने!
गुहागर | प्रतिनिधी
गुहागर तालुक्यातील पडवे पंचायत समिती गण आता चुरशीच्या टप्प्यात पोहोचला असून, अपक्ष उमेदवार आनंद भोजने यांच्या प्रचाराला जोरदार गती मिळाली आहे. शिवस्वराज्य शेतकरी संघटनेला समर्पित असलेले भोजने हे काम करणारा, अडचणीत धावून जाणारा कार्यकर्ता अशी ओळख निर्माण करत असल्याने, विशेषतः तरुण मतदारांचा वाढता पाठिंबा त्यांना मिळत आहे.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भोजने यांनी मुसंडी घेतली असून, गावोगावी त्यांच्याभोवती उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. मतदारांचा थेट संवाद, स्थानिक प्रश्नांची जाण आणि सातत्याने केलेले समाजकार्य यामुळे भोजने हे विश्वासार्ह पर्याय म्हणून पुढे येत आहेत.
दरम्यान, आबलोली येथे काल बहुजन समाज पार्टी, गुहागर विधानसभा येथील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आनंद भोजने यांची भेट घेत जाहीर पाठिंबा दिला. या गणातील आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत तुमचा प्रचार पोहोचवू, असा ठाम शब्द बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
या भेटीप्रसंगी बहुजन समाज पार्टीचे गुहागर तालुका अध्यक्ष उदय पवार, जिल्हा कोषाध्यक्ष सखाराम पवार, जिल्हा अध्यक्ष प्रवीण मर्चंडे, जिल्हा प्रभारी सचिन मोहिते, तालुका सचिव उज्ज्वल पवार यांच्यासह भोजने यांचे सहकारी समीर सुर्वे, उमेश सुर्वे, उमेश महाकाळ, दीपक सुर्वे तसेच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आनंद भोजने यांनी बहुजन समाज पार्टीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आभार मानत,
“तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, तो मी नक्कीच पूर्ण करेन,” असे ठाम आश्वासन दिले.
एकूणच, पडवे पंचायत समिती गणात आता प्रत्येक मत मोलाचे ठरत असून, सर्व उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, वाढता जनसमर्थनाचा कौल पाहता, आनंद भोजने यांचे पारडे दिवसेंदिवस जड होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.















