आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

रत्नागिरी:- निलेश रहाटे
राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने व गंजलेले वीज पोल अखेर बदलण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम पूर्ण झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
बौद्ध वाडीतील नागरिकांनी सांगितले की, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच हे धोकादायक पोल बदलणे अत्यंत गरजेचे होते. या कामासाठी आयु. अरुण नारायण तांबे यांनीही पुढाकार घेत संबंधित यंत्रणेशी समन्वय साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे काम वेळेत पूर्ण झाले.
राजापूर महावितरणचे वायरमन आयु. महेश तांबे यांनीही या कामात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या तांत्रिक मदतीमुळे पोल बदलण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडली.
वृत्तपत्रांशी बोलताना आयु. अरुण नारायण तांबे यांनी सांगितले की, “पावसाळ्यापूर्वी धोकादायक पोल बदलणे अत्यंत आवश्यक होते. आता हा धोका टळल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.”
दरम्यान, बौद्ध वाडीतील ग्रामस्थांनी तसेच आयु. अरुण तांबे यांनी सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांचे जाहीर आभार मानत त्यांच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.















