शीर्षक: विवाहास नकार दिल्याने विरारमध्ये मायलेकींची हत्या; आरोपीनेही आत्महत्येचा प्रयत्न
: प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद टोकाला; विरार पश्चिमेतील पूनम आकांक्षा इमारतीतील धक्कादायक घटना
विरार | प्रतिनिधी
विरार पश्चिम भागातील गणपती मंदिर परिसरातील पूनम आकांक्षा इमारतीत बुधवारी दुपारी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. विवाहास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने प्रेयसी आणि तिच्या आईवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मायलेकींचा जागीच मृत्यू झाला असून, त्यानंतर आरोपीने स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील मोरेगाव परिसरात राहणारा २७ वर्षीय शिवम उपाध्याय आणि २४ वर्षीय नॅन्सी मिश्रा यांच्यात मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या नात्याला विवाहाचे स्वरूप देण्यासाठी मंगळवारी रात्री शिवम काही नातेवाईकांसह नॅन्सीच्या घरी गेला होता. मात्र, नॅन्सीची आई सरिता मिश्रा यांनी या विवाहास विरोध दर्शवला. त्यानंतर नॅन्सीनेही लग्नास नकार दिला.
याच नकाराचा राग मनात धरून बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास शिवम पुन्हा पूनम आकांक्षा इमारतीतील सदनिका क्रमांक ३०१ मध्ये पोहोचला. त्याने फ्लॅटचा दरवाजा आतून बंद करून घेत घरातील चाकूने नॅन्सी आणि तिची आई सरिता मिश्रा यांच्यावर सलग वार केले. या हल्ल्यात दोघींचाही जागीच मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर आरोपीने ब्लेडच्या साहाय्याने स्वतःचा गळा कापत आत्महत्येचा प्रयत्न केला. झटापटीदरम्यान घरातील खिडकीची काच फुटल्याने शेजाऱ्यांना प्रकाराची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले.
माहिती मिळताच बोळींज पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खिडकीतून प्रवेश करत दरवाजा उघडला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. जखमी अवस्थेतील आरोपी शिवमला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
प्राथमिक तपासात एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून बोळींज पोलीस पुढील तपास करत आहेत.
समाजासाठी इशारा
नातेसंबंधांमध्ये नकार स्वीकारण्याची मानसिकता कमी होत चालल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. संवाद, समुपदेशन आणि संयम यांची गरज आज अधिक तीव्रतेने जाणवत आहे.















