नाटे ग्रामपंचायतीचा प्लास्टिक बंदीचा दणका; नियम मोडल्यास 25 हजार दंड व परवाना रद्द
प्रशांत पोवार *नाटे, ता. राजापूर :
पर्यावरणपूरक गाव बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत नाटे ग्रामपंचायतीने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या अधिसूचनेनुसार व न्यायालयाच्या निर्देशांनुसार ग्रामपंचायतीने सर्व दुकानदार, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, फेरीवाले व मच्छी विक्रेत्यांना जाहीर नोटीस बजावली आहे. सरपंच संदिप बांदकर, उपसरपंच अन्वर घालवेलकर व ग्रामविकास अधिकारी आर. एल. राऊत यांच्या स्वाक्षरीने दि. 20 जून 2026 रोजी ही नोटीस काढण्यात आली.
नोटीसमध्ये प्लास्टिकच्या कॅरी बॅग, प्लास्टिकचे चमचे, ग्लास, ताट, कप तसेच थर्माकोलचे साहित्य आणि प्लास्टिकचे वेष्टन वापरण्यास व विकण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी ग्राहकांना सामान देण्यासाठी कागदी पिशव्या, कापडी पिशव्या किंवा ज्यूटच्या पिशव्या वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्राहकांनीही स्वतःसोबत कापडी पिशवी आणावी यासाठी व्यापाऱ्यांनी त्यांना प्रवृत्त करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही नोटीस मिळाल्यापासून दुकानात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर अथवा साठा आढळल्यास महाराष्ट्र विघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्या वेळी 5 हजार रुपये, दुसऱ्या वेळी 10 हजार रुपये तर तिसऱ्या वेळी 25 हजार रुपये दंडासह दुकानाचा परवाना रद्द करण्याची शिफारस केली जाईल, असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी व पर्यावरण रक्षणाच्या राष्ट्रीय कार्यात सर्वांनी ग्रामपंचायतीला पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंतीही नोटीसमध्ये करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पंचक्रोशीतील व्यापाऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे.














