पनवेलमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून जिल्हा परिषद शाळेचे कौतुक; शिक्षकांच्या कार्याला सलाम! विदयार्थ्यांनमध्ये नवचैतन्याचे वातावरण
नवीमुंबई (मंगेश जाधव)
शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील वहाळ येथील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट देत शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री स्वतः शाळेत पोहोचल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. राज्यभर सुरू असलेल्या प्रवेशोत्सव आणि शाळा स्वागत उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी शाळेतील डिजिटल शिक्षण व्यवस्था, आधुनिक अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शिक्षकांचे समर्पित कार्य जवळून पाहिले. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते शिक्षण न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “आज महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांचे शिक्षण हे ९० टक्के खासगी शाळांपेक्षाही अधिक दर्जेदार झाले आहे.” या विधानामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याला मोठी दाद मिळाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, राज्य शासन शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असून डिजिटल वर्गखोल्या, संगणक प्रयोगशाळा, कौशल्याधारित शिक्षण, मूल्यवर्धन कार्यक्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी तयार केले जात आहे. राज्यातील शासकीय शाळांमध्येही आता दर्जेदार आणि स्पर्धात्मक शिक्षण मिळू शकते, हा विश्वास पालकांमध्ये निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिक्षकांच्या कार्याचा गौरव करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “शिक्षक हे राष्ट्रनिर्माते आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतील बदलाचे खरे शिल्पकार शिक्षकच आहेत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांनी अलीकडील काळात डिजिटल शिक्षण, नवोपक्रम, इंग्रजी संवाद कौशल्य, विज्ञान प्रयोग आणि कौशल्य विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्य सरकार देखील आधुनिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देत असल्याचे विविध उपक्रमांमधून दिसून येते.
शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री स्वतः जिल्हा परिषद शाळेत पोहोचून शिक्षकांचे कौतुक केल्याने राज्यभरातील शिक्षकांना मोठा उत्साह मिळाला आहे. सामाजिक माध्यमांवरही या भेटीची आणि शिक्षकांच्या गौरवाची चर्चा सुरू आहे.










