धाराशिवच्या राजकारणात मोठी खळबळ; नंदूराजे निंबाळकरांचे ओमराजेंना थेट आव्हान
‘पक्षाने जबाबदारी दिली तर निवडणूक लढवणार’; निंबाळकर कुटुंबातील अंतर्गत संघर्षामुळे मशाल चिन्हासमोर नवे आव्हान
धाराशिव : ‘ऑपरेशन टायगर’नंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मशालीची साथ सोडल्यानंतर आता निंबाळकर कुटुंबातूनच त्यांच्याविरोधात आव्हान उभे राहिले आहे. दिवंगत नेते पवनराजे निंबाळकर यांचे सुपुत्र नंदूराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे गटात राहून ओमराजेंवर निशाणा साधला आहे.
नंदूराजे निंबाळकर यांनी आगामी निवडणुकीत पक्षाने आणि उद्धव ठाकरे यांनी संधी दिल्यास मैदानात उतरण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. “गद्दारांविरोधात लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल,” असा इशारा त्यांनी दिला.
ओमराजेंच्या पक्षबदलावर टीका करताना नंदूराजे म्हणाले की, संकटाच्या काळात पक्षाला साथ देण्याची गरज असताना सत्तेसाठी आणि निधीसाठी पक्षाशी व मतदारांशी बेईमानी केली गेली, हे दुर्दैवी आहे.
“आम्ही पळपुटे नाही. आमच्या रक्तामध्ये निष्ठा आहे. कठीण काळातही आम्ही उद्धव ठाकरे साहेबांसोबत आणि शिवसेना (ठाकरे गट) सोबत ठामपणे उभे राहू,” असेही त्यांनी सांगितले.
धाराशिवच्या जनतेने नेहमी निष्ठेला महत्त्व दिले आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्यांना मतदार आगामी निवडणुकीत उत्तर देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, नेते गेले तरी सामान्य शिवसैनिक आजही पक्षासोबत असून, मशाल चिन्ह अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते जोमाने काम करत असल्याचा दावा नंदूराजे निंबाळकर यांनी केला आहे.
#NandurajeNimbalkar #DharashivNews #UddhavThackeray #ShivsenaUBT #MaharashtraPolitics









