जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या आणि तथ्यहिन आरोपांवरती कोणीही विश्वास ठेवू नये

जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या आणि तथ्यहिन आरोपांवरती कोणीही विश्वास ठेवू नये

 

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष- संजय सावंत, कार्यवाह – राजू जठार आणि जिल्हा हॉटेल संघटनेचे अध्यक्ष राजन नाईक यांचे आवाहन

 

तळेरे प्रतिनिधी प्रज्वल गायकवाड ११ऑगस्ट २०२६

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, जिल्हा हॉटेल संघटना आणि सर्व तालुका व्यापारी संघटना यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व हाॅटेल व्यावसायिक जिल्ह्यात अन्नपदार्थ आणि पाणी तपासणी कॅम्प NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून सुरु करण्यात आलेले आहेत. अन्नपदार्थ आणि पाणी तपासणी अहवाल जिल्ह्यातील व अन्य शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल ग्राह्य मानण्यात येत नाही. त्यामुळे NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून घेण्यात आलेलाच अहवाल स्वीकारला जातो. यामुळेच जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्ह्यातील अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या लहान, मोठ्या व्यावसायिकांची होणारी गैरसोय आणि सर्व खर्चीक गोष्टी लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व व्यापारी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना त्या त्या ठिकाणी सोय व्हावी यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्ह्यात सर्वत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोणाचीही फसवणूक किंवा पैशाची लूट करण्याचा प्रश्नच येत नाही. हवी असल्यास त्याबाबत राज्यातील मोठ्या शहरातील संबंधित NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून दरांबाबत खातरजमा करून घ्यावी म्हणजे खरं सत्य बाहेर पडेल असा विश्वास जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत व जिल्हा कार्यवाह राजू जठार आणि जिल्हा हॉटेल संघटनेचे अध्यक्ष राजन नाईक यांनी व्यक्त केला आहे.

 

जिल्हा व्यापारी महासंघांने प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे की, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अन्न सुरक्षेच्या कायदयाची कडक आणि काटेकोर अंमलबजावणी सर्वत्र सुरु आहे. यापूर्वी जिल्ह्यात अन्न प्रशासनाच्या नियमाप्रमाणे अन्नसुरक्षा प्रशिक्षण शिबिरे संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी पार पडली. या शिबिरांमधून अन्न सुरक्षेबाबत भविष्यात कोणती काळजी घ्यायची व कोणते नियम पाळायचे याबाबत संपूर्ण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून माहिती दिलेली आहे. या शिबिरांना जिल्ह्यातील व्यापारी बांधवांनी मोठया प्रमाणात उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला होता. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याबाबतची प्रमाणपत्रे संबंधित व्यापाऱ्यांना देण्यात आलेली आहेत. जिल्हा व्यापारी महासंघ नेहमीच व्यापाऱ्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आलेला आहे आणि यापुढेही करत राहणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारचे कृत्य कोणीही करु नये.

 

त्याप्रमाणे अन्नसुरक्षा प्रमाणपत्रे काढणे, प्रमाणपत्रांचे नुतणीकरण करणे, पेस्ट कन्ट्रोल करून घेणे, तळलेल्या तेलचा पुनर्वापर टाळणे, हॅन्डग्लोव्हज, कॅप, ॲप्रल वापरणे, पाणी व अन्न पदार्थ तपासून घेणे, स्वच्छता राखणे, मुदतबाह्य झालेल्या वस्तू विक्री न करणे, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ शितगृहात स्वतंत्र ठेवणे, वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र घेणे, व्यवसायाच्या ठिकाणी धुम्रपान, मद्यपान न करणे आदी नियम समजावून सांगितले आहेत. ग्राहकांना बाटली बंद पाण्याचा आग्रह न करता स्वत:कडील तपासणी केलेले स्वच्छ पाणी पुरविणे इत्यादी नियमांची माहिती देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे वरिल प्रत्येक गोष्टी जिल्ह्यातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक यांनी गेल्या दोन महिन्यांच्या काळात स्वतःहून याची काटेकोरपणे, स्वयंस्फूर्तीने अंबजावणी करत आहेत.

 

दोन दिवसांपूर्वी काही वृत्तपत्रात जिल्ह्यातील पाणी व अन्नपदार्थ तपासणीच्या दराबाबत जिल्ह्यातील व्यापारी बांधवांची लूट चालली आहे अशी बातमी प्रसिध्द झालेली होती. खरंतर ही तपासणी NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतूनच करणे आवश्यक व बंधनकारक आहे. असे अन्न व औषध प्रशासनाकडून आधीच जाहीर करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात कुडाळ एमआयडीसी मध्ये अशाप्रकारची प्रयोगशाळा आहे. मात्र त्याकडे दराची चौकशी केली असता पाणी तपासणीसाठी प्रत्येकी ४२००/- रुपये इतकी रक्कम घेण्यात येणार असल्याचे चौकशी अंती समजले. त्यानंतर अशा अनेक प्रयोगशाळेकडून कोटेशन मागविण्यात आली. राज्यातील जवळ जवळ सर्वच प्रमुख शहरांमधील प्रयोगशाळेमध्ये दरांबाबत विचारना केली असता तीन हजार ते चार हजार पाचशे अधिक जीएसटी असे दर देण्यात आले होते.

 

जिल्हयात दोन शासकिय प्रयोगशाळा आहेत. मात्र त्या NABL मान्यता प्राप्त नसल्याने त्यांचे अहवाल अन्न प्रशासन विभाग ग्राह्य मानत नाहीत. त्यामुळे खाजगी मान्यता प्राप्त प्रयोगशाळांमधून ही तपासणी केली जाते. या प्रयोगशाळा पूणे, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, गोवा, सांगली याच ठिकाणी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने राज्यातील विविध प्रयोगशाळांशी संपर्क करून दरांचे कोटेशन मागविण्यात आले. आणि शेवटी सवलतीच्या दरात सर्वात कमी दर देणाऱ्या कंपनीच्या प्रयोगशाळेची सर्वानुमते निवड करून ही तपासणी सर्व कागदपत्रे तपासून तसेच जिल्हा प्रशासनाला प्रयोगशाळांची प्रमाणपत्रे त्याचबरोबर इतर आवश्यक सर्व गोष्टी तपासायचे ते निश्चित करून आणि तांत्रिकदृष्ट्या सर्व काळजी घेऊनच तपासणी शिबिरे जिल्ह्यातील विविध भागात घेण्यात येत आहेत. तपासणी करत असताना केंद्रासमोर वजा १५ सें. कोल्ड स्टोअरेज व्हॅन उभी केलेली होती. जसे जसे पदार्थ जमा होत होते तसे ते लेबल लावून पॅकिंग करून कोल्ड स्टोअरेज व्हॅन मध्ये ताबडतोब ठेवले जात होते. आणि त्याच रात्री हे पदार्थ प्रयोगशाळेत पाठविले गेले आहेत. आणि लगेचच तपासणीला सुरुवात देखील करण्यात येत आहे.

 

यापूर्वी अनेक हाॅटेल व्यावसायिकांनी आपल्या पाणी व अन्नपदार्थाची तपासणी पूणे, गोवा, मुंबई, नाशिक येथे स्वतः पाठवत असत किंवा घेऊन जात असत. त्यावेळी त्यांना या तपासणी शुल्काच्या दुप्पट रक्कम भरावी लागत होती. म्हणूनच जिल्हा व्यापारी महासंघ, हाॅटेल व्यावसायिक संघ आणि सर्व तालुका व्यापारी संघटना यांनी जिल्ह्यातील व्यापारी बांधवांचे पैसे व वेळ वाचावा शिवाय त्यांना जिल्ह्यातील प्रत्येक बाजारपेठांतील सर्व

सॅम्पल जमा करणे सोपे व्हावे, सुरक्षा प्रशासनाच्या नियमांचे पालन व्हावे आणि येणाऱ्या गणेश चतुर्थी सणापूर्वी आमचा व्यापारी सर्व नियमांच्या आधिन राहून, कोणतीही भिती न बाळगता बिनधास्त व्यापार करता यावा यासाठीच जिल्ह्यात विविध ठिकाणी हे कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहेत.

 

जिल्हा व्यापारी महासंघ गेले ३७ वर्षे सर्व व्यापारी, व्यावसायिकांच्या हितासाठी काम करत आहे. अनेक कठिण प्रसंगात, समस्यांमध्ये व्यापारी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आपल्या व्यापाऱ्याने भयमुक्त व्यापार करावा, त्याचबरोबर ग्राहकांना स्वच्छ, आरोग्यास योग्य अन्नपदार्थ, पाणी मिळावे यासाठी आमचा व्यापारी नेहमीच प्रयत्नशील असतो.

 

सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांनासुध्दा सर्व व्यावसायिकांकडून चांगल्या सुविधा बरोबरच चांगले अन्न, पाणी इतर सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत व आपल्या जिल्ह्याचे नावलौकिक व्हावे यासाठीच अशा विविध मोहिमा महासंघ, हाॅटेल संघटना आणि तालुका संघटना राबवित आहेत.

 

आम्ही महासंघ आणि हाँटेल व्यावसाईकांच्या वतीने गेल्या महिन्यातच या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तसेच विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांना लेखी निवेदन देऊन जिल्ह्यात शासकिय प्रयोगशाळा या NABL मान्यताप्राप्त करून मिळाव्यात व जिल्ह्यातील व्यापारी व हॉटेल व्यावसायीकांना या जिल्ह्यातच अल्प दराने पाणी आणि अन्न पदार्थाची तपासणी करुन मिळावी यासाठी आग्रही मागणी केली असल्याचे सांगितले आहे.

 

पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत सकारात्मक विचार करून लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशी प्रयोगशाळा आणण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

 

आमच्या सर्व संघटना या जिल्ह्यातील व्यापारी बांधवांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील या शिबिराच्या माध्यमातून व्यापाऱ्यांची लूट चालू आहे हे बिनबुडाचे बेछुटपणे केलेले आरोप धडीत खोटे आहेत. त्यामुळे विनाकारण जिल्ह्यातील व्यापारी वर्गामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या सर्व गोष्टींची सत्यता पडताळून मगच अशा प्रकारे भाष्य करणे आवश्यक होते. तरी जिल्ह्यातील सर्व व्यापारी बांधवांनी अशा दिशाभूल करणाऱ्या आणि तथ्यहिन आरोपांवरती कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष- संजय सावंत, कार्यवाह – राजू जठार आणि जिल्हा हॉटेल संघटनेचे अध्यक्ष राजन नाईक दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें