राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांच्या ३० अटी
८ ते १० हजार विद्यार्थी-तरुणी उपस्थित राहण्याची शक्यता; गर्दी नियंत्रण, सीसीटीव्ही आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत पोलिसांच्या सूचना
पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी ३० अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे. वेळेचे काटेकोर पालन, गर्दी नियंत्रण, प्रवेशद्वारांची व्यवस्था, सीसीटीव्ही, स्वयंसेवकांची नियुक्ती तसेच आक्षेपार्ह मजकूर आणि धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याबाबत पोलिसांनी आयोजकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम शनिवार, २२ ऑगस्ट रोजी पुणे आरटीओ कार्यालयाशेजारील एसएसपीएमएसच्या मैदानावर होणार आहे. परिमंडळ पाचच्या पोलीस उपआयुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी विविध अटी-शर्तींसह या कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. पोलिसांनी यासंदर्भातील नियमावलीचे पत्र काँग्रेसला दिले आहे.
सायंकाळी ४.३० ते रात्री ९.३० पर्यंत कार्यक्रम
पोलिसांच्या परवानगीनुसार कार्यक्रमासाठी सायंकाळी ४.३० ते रात्री ९.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. कार्यक्रमाला सुमारे ८ हजार ते १० हजार नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता गृहीत धरून गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमस्थळी क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांना प्रवेश देऊ नये, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, तसेच ये-जा करण्यासाठी किमान चार प्रवेशद्वारे ठेवावीत, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत. संबंधित विभागांची आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे घेण्याचेही आयोजकांना सांगण्यात आले आहे.
स्वयंसेवकांसह सीसीटीव्हीवर भर
गर्दीचे नियोजन करण्यासाठी मोठ्या संख्येने स्वयंसेवकांचा वापर करावा, त्यामध्ये महिला स्वयंसेवकांची संख्या अधिक असावी, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. कार्यक्रमस्थळी गोंधळ, गोंगाट किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची जबाबदारी आयोजकांवर सोपवण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या परिसरात दिवस-रात्र कार्यरत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच कार्यक्रमात कोणताही आक्षेपार्ह मजकूर वापरला जाणार नाही किंवा कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.
विद्यार्थिनी आणि तरुणींच्या सहभागासाठी काँग्रेसची तयारी
शहर काँग्रेसच्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून महिला आणि विद्यार्थिनी पुण्यात येणार आहेत. मोठ्या संख्येने तरुणी कार्यक्रमात सहभागी व्हाव्यात, यासाठी काँग्रेसकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.
राहुल गांधी या कार्यक्रमात विद्यार्थिनी आणि तरुणींशी संवाद साधणार असून, त्यांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
शहरभरात काँग्रेसकडून वातावरणनिर्मिती
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. पश्चिम विभागाच्या अध्यक्ष दीप्ती चवधरी आणि पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडून नियोजनावर विशेष भर देण्यात येत आहे.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बारकोडच्या माध्यमातून नावनोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रदेश पातळीवरील काँग्रेसचे नेते पुणे शहरात ठाण मांडून असून, समाजमाध्यमांवरून कार्यक्रमाचा प्रचार केला जात आहे.
शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये जाहिरात फलक व फ्लेक्स लावण्यात आले आहेत. काँग्रेसकडून कार्यक्रमासाठी विशेष टी-शर्ट तयार करण्यात आले असून, बुधवारी त्याचे अनावरण करण्यात आले. त्यामुळे राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात काँग्रेसकडून जोरदार वातावरणनिर्मिती सुरू झाली आहे.










