साटवली-बाणेवाडी ते जुलूमवाडी रस्ता मोकळा; जगदीश जुलूम यांच्या पुढाकाराने झाडी-झुडपांची साफसफाई
ग्रामपंचायतीकडून निधीअभावी काम रखडले; स्वतःच्या खर्चाने रस्ता स्वच्छ करून वाहतूक केली सुरळीत
लांजा / प्रतिनिधी : जितेंद्र चव्हाण
साटवली-बाणेवाडी ते बावलादेवी-जुलूमवाडी या मुख्य रस्त्यावर वाढलेल्या झाडी-झुडपांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे थेट रस्त्यावर आल्याने पादचारी आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवसेना (उबाठा) लांजा तालुका संपर्कप्रमुख व डोंबिवली उपशहर प्रमुख जगदीश जुलूम यांनी स्वतःच्या खर्चातून रस्त्यावरील झाडी-झुडपे हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
गेल्या काही महिन्यांपासून हा रस्ता झाडे-झुडपांनी वेढला गेला होता. झाडांच्या फांद्या आणि वाढलेली झुडपे रस्त्यावर आल्याने पादचाऱ्यांना चालणे तसेच वाहनधारकांना वाहने चालवणे कठीण झाले होते. अनेक ठिकाणी समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
ही परिस्थिती स्थानिक ग्रामस्थांनी जगदीश जुलूम यांच्या निदर्शनास आणून देत मदतीची मागणी केली. त्यानंतर जुलूम यांनी तत्काळ ग्रामपंचायतीशी संपर्क साधून रस्त्याच्या साफसफाईबाबत चर्चा केली. मात्र, निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीकडून केवळ चहा-पाण्यासाठी २०० ते २५० रुपये देऊ शकतो, असे सांगण्यात आल्याने प्रत्यक्ष कामासाठी निधी उपलब्ध होऊ शकला नाही.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जगदीश जुलूम यांनी कोणत्याही निधीची प्रतीक्षा न करता स्वतः पुढाकार घेतला. स्वतःच्या खर्चातून स्थानिक कामगारांच्या मदतीने रस्त्यावरील झाडे-झुडपे, वाढलेल्या फांद्या आणि अडथळे हटवून संपूर्ण रस्ता स्वच्छ करण्यात आला.
रस्त्याची साफसफाई झाल्यानंतर वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून वाहतूक अधिक सुरळीत झाली आहे. जनहिताच्या दृष्टीने तत्परतेने केलेल्या या कामाबद्दल साटवली, बाणेवाडी, जुलूमवाडी, लावणवाडी आणि पनोरे परिसरातील ग्रामस्थांकडून जगदीश जुलूम यांचे आभार मानण्यात येत असून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.












