पाचाड येथे दिव्यांग व शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन
महाड, २१ मार्च – राज्यातील दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन तीन दिवस चालणार असून, यामध्ये राज्यभरातील दिव्यांग मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सचिन साळुंखे, ओंकार साळुंखे, प्रहार अपंग क्रांती संस्थेचे महाराष्ट्र सचिव सुरेश मोकळ, राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव, रायगड जिल्हाध्यक्ष सुनील गणबोडे, महाराष्ट्र संपर्कप्रमुख रामदास खोत, अभियान प्रमुख महेश बडे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य सरकारच्या धोरणांवर घणाघात
यावेळी बोलताना माजी आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका केली. ते म्हणाले, “आज धर्म आणि जातिपातीच्या राजकारणामुळे सरकार नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करत आहे. औरंगजेबाने त्याच्या काळात ज्या प्रमाणात लोक मारले नसतील, त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे हे भयावह चित्र उभे राहिले आहे.”
बच्चू कडू पुढे म्हणाले, “महागाई वाढली असून, दिव्यांगांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही, त्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नाही. लाडकी बहीण योजना फक्त कागदावर असून, राज्याच्या अर्थसंकल्पात मजूर, दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी कोणतीही विशेष तरतूद नाही. दिव्यांग मंत्रालयासाठी १४०० कोटींची तरतूद करण्यात आली, पण त्यातील १२०० कोटी रुपये केवळ पगारावर खर्च झाले आहेत. निधीच नसेल तर हे मंत्रालय कसे चालणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज्य सरकारला इशारा – मागण्या मान्य न झाल्यास लढा तीव्र
प्रहार जनशक्ती पक्षाचे सचिन साळुंखे यांनी सांगितले की, “हे आंदोलन म्हणजे रायगडाच्या राजधानीतून राज्याच्या राजधानीला दिलेला इशारा आहे. दिव्यांगांना दरमहा ६००० रुपये मानधन, घर, स्वाभिमानाने जगण्याची संधी, स्वयंरोजगारासाठी स्टॉल, राष्ट्रीय बँकेकडून निधी, प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन, अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी अशा विविध मागण्या सरकारकडे मांडल्या आहेत.”
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी, २३ मार्च रोजी शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलनाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळापासून पायी मोर्चाने करण्यात आली. आंदोलनस्थळी दीपप्रज्वलन, भारतमाता पूजन व तिरंगा ध्वजपूजन करून अधिकृत सुरुवात करण्यात आली.
राज्यातील सर्व जिल्ह्यांतून दिव्यांग बंधू-भगिनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले असून, सरकारने त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.