जयसिंग (जया) माने यांचा शिवसेना (उबाठा) गटाला रामराम, लवकरच शिंदे गटात प्रवेश
लांजा- राजापूर साखरपा विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावान नेते जयसिंग (जया) माने यांनी आपल्या पदाचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा शिवसेना सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्याकडे वैयक्तिक कारणास्तव सुपूर्द केला आहे.
माने यांनी मागील ३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय भूमिका बजावली असून १९९४ मध्ये विद्यार्थी दशेत असताना शाखाप्रमुख पदावरून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली आणि संघटन कौशल्याच्या जोरावर सर्व पक्षीयांमध्ये त्यांची ओळख निर्माण झाली. संगमेश्वर पंचायत समिती सभापती म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती.
माने यांच्या या राजीनाम्यामुळे शिवसेना (उबाठा) गटात खळबळ उडाली असून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. लवकरच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या या निर्णयामुळे लांजा-राजापूर आणि संपूर्ण कोकणातील राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव पडणार असल्याचे बोलले जात आहे.