मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे गुणवंतांचा गौरव
( तालुकास्तरीय ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेत विदिशा जाधव व निधी जाधव गुहागरमध्ये प्रथम )
आबलोली (संदेश कदम)
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गुहागर तालुका मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे संपन्न झालेल्या गुहागर तालुकास्तरीय ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेतील गुणवंतांचा गौरव समारंभ गुहागर विद्यालयात नुकताच संपन्न झाला.सदर स्पर्धेत प्राथमिक गटात गुहागर विद्यालयाची विदिशा प्रदिप जाधव व माध्यमिक गटात मुंढर हायस्कूलची निधी मंगेश जाधव यांनी प्रथम क्रमांक संपादन केला.
सदरच्या ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेत प्राथमिक – इयत्ता पाचवी ते सातवी व माध्यमिक -इयत्ता आठवी ते दहावी या दोन गटात बहुसंख्य विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
प्राथमिक गटामध्ये कु.विदिशा प्रदीप जाधव – गुहागर हायस्कूल – प्रथम क्रमांक , कु.समृद्धी योगेश गोवळकर – आबलोली विद्यालय – द्वितीय क्रमांक व कु. आरोही शैलेश साळवी – जामसूत विद्यालय -तृतीय क्रमांक तसेच माध्यमिक गटात कु.निधी मंगेश जाधव -मुंढर विद्यालय – प्रथम क्रमांक , कु.सई समीर रानडे – कोळवली विद्यालय – द्वितीय क्रमांक व कु.सिद्धी नरेंद्र मोरे – कोतळूक विद्यालय – तृतीय क्रमांक संपादन केला.
सदरच्या गौरव कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून गुहागर पं.स.शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.क्षीरसागर , गुहागर तालुका मराठी भाषा मंडळ गुहागरचे अध्यक्ष व कार्यक्रमाध्यक्ष एस.बी.चांदीवडे , गुहागर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम.डी गोरीवले , गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे , परीक्षक व गुहागर वरिष्ठ महाविद्यालयाचे डॉ.प्रा.बाळासाहेब लबडे , उपाध्यक्षा सौ.संपदा चव्हाण, उपाध्यक्ष पी.बी.जाधव , सचिव एस.एम.आंबेकर , खजिनदार पी.आर. वैद्य , सहखजिनदार एस.बी.रामाणे , गुहागर हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका सौ.कांबळे , पर्यवेक्षक एम.गंगावणे , संघटनेचे सदस्य शिर्के, श्रीम.वाघे , श्रीम.पवार , सौ.कांबळे , सौ.भोसले , सौ.ठाकूर , श्री.मोहिते आदी उपस्थित होते .
गुहागर तालुकास्तरीय ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह , प्रमाणपत्र , शालेय वस्तू व पुष्प मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन व परीक्षक डॉ.प्रा.बाळासाहेब लबडे व डॉ.प्रा.जालिंदर जाधव यांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. गुहागर तालुका मराठी भाषा मंडळाचे सचिव एस.एम. आंबेकर यांनी संघटनेतर्फे राबवले जाणारे उपक्रम , विद्यार्थ्यांना मिळणारी संधी व विद्यार्थ्यांचे विकसित होणारे कौशल्य , संघटनेतर्फे राबविल्या जाणाऱ्या उपक्रम व कार्यक्रमासाठी अधिकारी , पदाधिकारी व सदस्यांचे तसेच मान्यवरांचे लाभणारे सहकार्य , संघटनेतर्फे राबवलेल्या जाणाऱ्या उपक्रमांचा हेतू प्रास्ताविकातून सांगितले. तसेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेचे महत्व व मोल , गुहागर तालुकास्तरीय ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेसाठी प्रत्येक विद्यालयातील प्रत्येकी प्राथमिक व माध्यमिक गटातून दोन विद्यार्थ्यांच्या सहभागाचे आयोजन याबाबत माहिती दिली.
गुणवंत विद्यार्थिनी विदिशा जाधव हिने “आर्जव ” व समृद्धी गोवळकर हिने ” बाप ” या ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेतील कविता सादर केल्या.कु.सई रानडे हिने मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे राबवलेल्या स्पर्धांमुळे लेखन व वाचनाला संधी मिळाली .तसेच अशा राबविल्या जाणाऱ्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना वकृत्व सादर करण्याचे धैर्य मिळते असे सांगितले. शिक्षण विस्तार अधिकारी श्री.क्षीरसागर यांनी गुणवंत विद्यार्थी व आयोजकांचे अभिनंदन केले. गुहागर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी कविता सादर करून आयोजक , गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी वाचन करून काव्य प्रतिभा संपादन केली पाहिजे असे मार्गदर्शन केले. गुहागर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम.डी.गोरीवले यांनी गुहागर तालुका मराठी भाषा मंडळातर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले. विविध शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तेची संधी लाभते. लाभलेल्या संधीमुळे विद्यार्थ्यांना व विद्यालयाला सुयश संपादन करता येते असे मार्गदर्शन केले.उपाध्यक्षा सौ.एस.एस. चव्हाण , गुहागर हायस्कूलचे पर्यवेक्षक एम. गंगावणे यांनी सहभागी व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आयोजकांनी सदरचा उपक्रम राबवल्याबद्दल अभिनंदन केले.
वरिष्ठ महाविद्यालय गुहागरचे नामवंत प्राध्यापक व स्पर्धेचे परीक्षक डॉ.प्रा. बाळासाहेब लबडे यांनी गुहागर तालुका मराठी भाषा मंडळाने राबवलेल्या ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धेमुळे अनेक विद्यार्थ्यांना स्वरचित काव्यरचना करता येऊन कवितांचे वाचन करण्याची संधी लाभली. स्पर्धेत सादर केलेल्या काव्य वाचनातील आरोह-अवरोह , भाषेचा गोडवा , कवितेचे सादरीकरण अतिशय चांगले होते असे सांगून स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गौरव केला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राबवलेला हा शैक्षणिक उपक्रम योगदानाचा असून मराठी भाषेतील काव्य , ललित लेखन, कथा व निबंध लेखनासाठीच्या मार्गदर्शनासाठी सहकार्य करणार असे सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वरचित काव्यरचना करून काव्यसंग्रह प्रकाशित करण्यासाठी संधी लाभते व नवोदित साहित्यिकांसाठी शासनाकडून विशेष सवलती मिळतात याबाबत मार्गदर्शन केले .तसेच मराठीचे महत्व , संतांचे मराठी भाषेसाठी लाभलेले योगदान याबाबत मार्गदर्शन केले. गुहागर तालुका मराठी भाषा मंडळाचे अध्यक्ष व कार्यक्रमाध्यक्ष एस.बी.चांदिवडे यांनी संघटनेतर्फे राबवलेल्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी झालेली विद्यालये व विद्यार्थी यांच्या सहकार्याबद्दल अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळण्यासाठी संघटनेतर्फे दरवर्षी विविध स्पर्धात्मक उपक्रम राबवले जात आहेत. संघटनेतर्फे संपन्न होणाऱ्या उपक्रम व कार्यक्रमासाठी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांचे सहकार्य लाभते. गुणवंत विद्यार्थी समारंभासाठी गुहागर हायस्कूलचे सहकार्य लाभल्याबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी तसेच गुहागर तालुका मराठी भाषा मंडळ गुहागरचे पदाधिकारी व सदस्य यांना धन्यवाद दिले. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुहागर विद्यालयाचे मराठी विषय शिक्षक व संघटनेचे उपाध्यक्ष पी.बी.जाधव यांनी केले. ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेतील बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर , गुहागर तालुका मराठी भाषा मंडळ गुहागरचे पदाधिकारी , गुहागर विद्यालय , गुणवंत व सहभागी विद्यार्थी , सहभागी विद्यालये यांचे सहकार्य लाभल्याबद्दल सहखजिनदार एस.बी रामाणे यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.