मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय: २४ तास दुकाने सुरू ठेवण्यास कोणताही बंदी नाही
मुंबई, २ एप्रिल २०२५ – ग्राहक आणि अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या २४ तास सुविधा देणाऱ्या दुकानांवर वेळेचे कोणतेही निर्बंध नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यासोबतच, पुणे पोलिसांना रात्री ११ वाजेपर्यंत दुकाने बंद करण्याची सक्ती न करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने दिलेल्या या निर्णयामुळे पुण्यातील ‘द न्यू शॉप’ चालवणाऱ्या ॲक्सिलरेट प्रॉडक्टएक्स व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडला मोठा दिलासा मिळाला आहे. याचिकाकर्त्यांनी स्थानिक पोलिस रात्री ११ नंतर दुकान बंद करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप केला होता.
न्यायालयाने स्पष्ट केले की, महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना कायद्यानुसार, हुक्का पार्लर, परमिट रूम, डान्स बार आणि मद्यविक्री करणाऱ्या रेस्टॉरंट्ससारख्या काही आस्थापनांना वगळता, इतर कोणत्याही दुकानांवर वेळेचे निर्बंध नाहीत. यासह, २०२० मध्ये सरकारने सिनेमागृहांना २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी दिल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
हा निर्णय ग्राहक, दुकानदार आणि अर्थव्यवस्थेसाठी मोठा बदल घडवणारा ठरणार असून बेरोजगारीच्या समस्येवरही काही प्रमाणात मदत होईल, असे न्यायालयाने अधोरेखित केले आहे.















